
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला मुंबई जिंकून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रं आपल्या हाती घेतली आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या आमदारांसोबत रविवारी रात्री दीड तास बैठक घेतली असून, या बैठकीत भाजपचा मुंबईसाठीचा मास्टर प्लॅन ठरला. काय आहे हा मास्टर प्लॅन? जाणून घेऊयात एबीपी माझाच्या खास रिपोर्टमधून.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपनं आत्ता मुंबईची सत्ता अर्थात पालिका काबीज करण्यासाठी मास्टल प्लॅन आखला आहे. हा प्लॅन ठरला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत. महापालिका जिंकण्यासाठीची जबाबदारी आमदारांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरु आहेत. या दोन्ही नेत्यांची ताकद, सर्वाधिक मतदार हे मुंबईत असून प्रामुख्यानं मराठी मतदारांवर या दोघांची मदार आहे. त्यामुळे भाजपनं ही संभाव्य युती लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या आमदारांना काही निर्देश दिले आहेत. मुंबईत महायुतीत कुठेही वाद नको, समन्वय राखा अशा सूचना दिल्या आहेत, त्यामुळे भाजप मुंबई महापालिका निवडणुका महायुतीतूनच लढणार हे जवळपास स्पष्ट आहे.
BJP Mission Mumbai : मुंबईसाठी भाजपनं काय प्लॅन आखला?
– मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यावर पुढील तीन महिने भर.
– मुंबई महापालिका जिंकणं सर्व आमदारांची जबाबदारी.
– मुंबईतील भाजपचा आमदार प्रत्येक वॉर्डातील समस्या जाणून घेणार.
– मुंबईत महायुतीत कुठेही वाद नको, समन्वय राखा, मुख्यमंत्र्यांची सूचना.
याशिवाय 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा, दुसऱ्या क्रमांकावरची मतं मिळालेल्या जागा निवडून आणण्याकरता भाजपचा प्रयत्न राहील. याशिवाय स्वबळावर निवडून येणाऱ्या काँग्रेस आणि इतर पक्षातील उमेदवारांना हेरुन त्यांना भाजपमधून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशा लढती तयार करण्याचा प्लॅन भाजपनं आखल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या वॉर्डातील असंतुष्टांना हेरुन तिथे मतविभागणी करणं, मुस्लिम, हिंदी भाषिक पट्ट्यात स्ववबळावर निवडून येणाऱ्या शिवसेना आणि इतर पक्षातील उमेदवारांना आपलंसं करणं असा प्लॅन आखण्यात आला आहे.
दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र या सणांच्या माध्यमातून मतांची विशेषत: मराठी मतांची जोडणी करणं असा रोडमॅप भाजपनं मुंबई जिंकण्यासाठी तयार केला आहे. हा रोडमॅप अखेरपर्यंत अनेक वळणंही घेऊ शकतो. याशिवाय मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी रस्ते काँक्रीटीकरणाची कामं, कोस्टल रोड, मेट्रो, मुंबईतल्या शहरांचं सौंदर्यीकरण अशा विविध विकासकामांचं भूमीपूजन, लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आहे.
तेव्हा भाजपनं मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी सर्वोतोपरी तयारी सुरु केली असून, यात भाजपला कितपत यश येतं हे मात्र येणारा काळच ठरवेल.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा