Headlines

BLOG : आठवणींची दहीहंडी अन् शाळेतले दहीपोहे

BLOG : आठवणींची दहीहंडी अन् शाळेतले दहीपोहे
BLOG : आठवणींची दहीहंडी अन् शाळेतले दहीपोहे


BLOG : काल आमचा शाळेतला मित्र अरुणचा व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आला. उद्या शाळेत कोणकोण येतंय सकाळी? निमित्त अर्थातच श्रीकृष्ण जन्माष्टमी पूजा आणि दहीपोह्यांच्या प्रसादाचं. आमच्या गिरगावातील आर्यन शाळेतली ही अनेक वर्षांपासूनची परंपरा. आम्हीही दरवर्षीप्रमाणेच शाळेत पोहोचलो. शाळेच्या पायऱ्या चढत असताना सगळे क्षण पुन्हा एकदा मनात दाटून येतात.

आयुष्याच्या अनेक पायऱ्या चढताना शाळेच्या या पहिल्या पायरीपासून झालेली सुरुवात आठवली. आमचे शाळेतले दिवस समोर तरळले. आमचे वर्गमित्र गिरीश, अरुण, निशांत आणि मी चौघेही भेटलो. एरवी फोनवर किंवा बाहेर भेटतो कधीकधी. पण, इथे शाळेच्या हॉलमध्ये या पूजेच्यानिमित्ताने भेटण्याचा आनंद काही औरच.

आम्ही शाळेत असतानाच्या शिक्षक वर्गापैकी बहुतेक सर्व मंडळी निवृत्त झाली आहेत. तरीही आताची शिक्षक मंडळीही खूप प्रेमाने आमचं स्वागत करतात. आमची, कुटुंबीयांची चौकशी करतात. हे क्षण शब्दात मांडणं कठीण आहे. ते प्रत्यक्ष अनुभवायलाच हवं. आज आम्ही गेलो तेव्हाही तीच आपुलकी, तोच ओलावा. खरं तर बाहेर बराच पाऊस पडल्याने आम्ही थोडे भिजूनच शाळेत पोहोचलो खरे. पण, इथल्या ओलाव्याने ते भिजणं मागे सरलं. हे आमच्या शिक्षक वर्गाच्या, मित्रपरिवाराच्या प्रेमात भिजणं, या दिवशी नक्कीच अनुभवायला मिळतं, तेव्हा भरभरून भिजायला आवडतं.

आमच्या वेळच्या शिक्षिका परब टीचर कांदिवलीहून खास आल्या होत्या. त्यादेखील गेली अनेक वर्षे हा दिवस चुकवत नाहीत. आजही भर पावसात आल्या. तेही वयाची पंचाहात्तरी पार केल्यावर. ही अशी ऊर्जाच आमच्यासाठी चांगलं काम करण्याचं बी पेरून जाते आणि हा उत्साहाचा पाऊसच त्या बीची मग मशागत करतो.

शिक्षकांचं, शाळेबद्दल अन् आमच्याबद्दल असलेलं हे प्रेम आम्हाला खेचून आणतं, दरवर्षी. या पूजेसाठी असलेल्या दहीपोह्यांच्या प्रसादाबद्दल मी याआधीही लिहिलंय. पण, त्याबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच आहे. आजही नेहमीप्रमाणेच मनसोक्त प्रसाद खाल्ला.

या दहीपोह्यांच्या चवीबद्दल मी काय आणखी काय सांगू, आम्ही दहावी होऊन 30-32 वर्षे झाली, तितकी वर्षे आम्ही शाळेत सातत्याने येतोय. तशीच चव आहे, अगदी आमच्या आधी दहावी झालेली मंडळी जी आता साठी-सत्तरीत आहेत, तीदेखील येत असतात आणि दहीपोह्यांच्या या प्रसादाचा आनंद घेत असतात. इतकी वर्षे झाली, पिढ्या बदलत राहिल्या, दहीपोहे तयार करणारे शिक्षकही काळानुरुप बदललेत, तरीही चव तशीच. हे थक्क करणारं आहे.

मला वाटतं, दहीपोहे करणारे हात निरनिराळे असतील, त्यातली कोथिंबीर, आलं या जिन्नसांचं प्रमाण कमी-जास्त होतही असेल. पण, शाळेबद्दलचं आणि आम्हा विद्यार्थ्यांबद्दलचं या शाळेतल्या शिक्षक वर्गाचं अगदी इथले विश्वस्त, अन्य कर्मचारी वर्ग याचं प्रेम, ती आपुलकी याचं प्रमाण हे मात्र अगदी जसंच्या तसं राहिलंय, ज्यामुळे दहीपोह्यांची चव बदलत नाही.

दहीपोह्यांसोबत आमच्या शिक्षकांशी, मित्रवर्गाशी गप्पांची मेजवानी, या दिवसाची गोडी आणखी खुलवते. तसंच आजही झालं. मग तास-सव्वा तास झाल्यावर सर्वांचा निरोप घेऊन, हे सर्व क्षण मनात साठवून मी निघालो. दहीपोह्यांची चव जिभेवर रेंगाळत. परब टीचरांसारख्या शिक्षकांच्या प्रेमाच्या झऱ्यात न्हाऊन निघतं. बाहेर रिपरिप पाऊस पडत होता. एव्हाना आम्ही आतून मात्र पूर्ण ओलेचिंब होतो. आता पुढचे वर्षभर याच आठवणींचे थर मनात लागत राहतील पुढच्या दहीहंडीपर्यंत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *