राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही मुंबई महानगर प्रदेश (MMR) परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक थोड्याच वेळात मातोश्री येथे होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने बोरिवली, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी रणनीतीवर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाईल. ठाणे जिल्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने, त्या जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. या परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद पुन्हा दाखवून देण्यासाठी आणि पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी या बैठकीत सखोल चर्चा होईल असे समजते. या बैठकीत एमएमआर क्षेत्रातील इतर महापालिकांचाही आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे.