
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले. बावनकुळे म्हणाले, “पोलीस योग्य आणि पारदर्शक पद्धतीने तपास करत आहेत. समन्स देणे म्हणजे अंतिम निर्णय नसतो. तपास प्रक्रियेचा तो एक भाग आहे.” ते पुढे म्हणाले की, “कोणाचंही नाव समोर आलं तर पोलिसांकडून चौकशी केली जाते. पोलिसांना योग्य वाटल्यास पुढील कारवाई केली जाते, अन्यथा संबंधित व्यक्तीला सोडण्यात येते.” समन्सबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “समन्स देणे ही सामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याला अनावश्यक मोठं स्वरूप देण्याची गरज नाही. पुढील कारवाई ही तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांवर अवलंबून असेल.” या प्रकरणात पुढे काय घडामोडी होतात आणि तपासातून कोणते निष्कर्ष समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.