
बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली असून, आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका सत्ताधारी गटाने घेतली आहे. मात्र, काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्याने बिनविरोध प्रयत्नांवर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. या पार्श्वभूमीवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून, शेवटच्या क्षणापर्यंत विरोधकांना विनंती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांच्या निधनामुळे ही निवडणूक संवेदनशील परिस्थितीत होत असल्याचे नमूद करत, राजकीय कटुता टाळण्याची गरज असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत सर्वांना आपली भूमिका मांडण्याचा आणि विनंती करण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, लक्ष्मण हाके यांची समजूत काढण्यात आली असून, लवकरच काँग्रेससोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहितीही छगन भुजबळ यांनी दिली आहे.