
Andheri Railway Station Viral Video: मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरू असल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि काही वातावरण तापले. ‘अंधेरी स्टेशन लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा नवीन अड्डा झाला आहे’ असा दावा करत हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर संपूर्ण प्रकरणाची खरी पार्श्वभूमी समोर आली असून व्हिडिओमध्ये केलेले दावे पूर्णत: खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय होता व्हिडिओ?
एका प्रवाशाने अंधेरी स्टेशनवर एक मुलगी प्लॅटफॉर्मवर बसलेली आणि तिच्या बाजूला एक वयस्कर पुरुष काही मंत्रसदृश उच्चार करत असल्याचे चित्रीकरण केले. हे दृश्य सोशल मीडियात व्हायरल करून त्याला धर्मांतराशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही तासांतच हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.
पोलिसांकडून तातडीची दखल
व्हिडिओ व्हायरल होताच अंधेरी जीआरपी आणि आरपीएफने तत्काळ तपास सुरू केला. व्हिडिओतील दोन्ही व्यक्तींचा शोध घेण्यात आला आणि काही तासांतच त्यांना ताब्यात घेऊन जबाब नोंदवण्यात आला.
तपासात काय समोर आले?
• मुलगी आणि वयस्कर पुरुष दोघांचाही कोणताही ख्रिश्चन धर्माशी संबंध नाही.
• दोघेही जैन हिंदू धर्मीय असून एकमेकांचे परिचित आहेत.
• वयस्कर नागरिक त्या मुलीला जपानी मेडिटेशन तंत्र शिकवत होते.
• त्यांच्या मते, हा कोणताही धार्मिक विधी नव्हता आणि धर्मांतराशी तर काहीही संबंध नव्हताच.
मुलीची पोलिसांकडे तक्रार
व्हिडिओला चुकीचा अर्थ लावून त्याचा प्रसार केल्याने आपली बदनामी होत असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. तसेच, व्हिडिओ शूट करून खोटी माहिती पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत तिने अंधेरी जीआरपीकडे औपचारिक तक्रार दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा