
पंजाब किंग्स टीमने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामात (IPL 2026) सलग दुसरा विजय मिळवला आहे. पंजाबने होम टीम चेन्नई सुपर किंग्सला घरच्या मैदानात 5 विकेट्सने लोळवलं. चेन्नईने पंजाबसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबने हे आव्हान 8 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. पंजाबने 18.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून विजयी आव्हान गाठलं. पंजाबसाठी पहिल्या 6 फलंदाजांनी दुहेरी आकड्यात धावा केल्या. मात्र कॅप्टन श्रेयस अय्यर आणि ओपनर प्रभसिमरन सिंह या दोघांनी पंजाबच्या विजयात बॅटिंगने सर्वाधिक योगदान दिलं. तसेच इतरांनीही हातभार लावला.
सीएसकेची बॅटिंग, पंजाब विरुद्ध 209 धावा
पंजाबने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 209 धावांपर्यंत मजल मारली. युवा फलंदाज आयुष म्हात्रे याने चेन्नईसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर सर्फराज खान, शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड या त्रिकुटानेही विस्फोटक खेळी केली.
संजू सॅमसन पुन्हा फ्लॉप
संजू सॅमसन 7 धावा करुन माघारी परतला. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 22 चेंडूत 28 धावा केल्या. आयुष म्हात्रे याने 43 बॉलमध्ये 73 रन्स केल्या. आयुषने या खेळीत 6 चौकार आणि 5 षटकार खेचले. ऑलराउंडर शिवम दुबे याने 27 बॉल 45 रन्स केल्या. तर सर्फराजने 12 बॉल 32 रन्स केल्या. पंजाबसाठी विजयकुमार वैशाख याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर इतर तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट फलंदाजाला बाद केलं.
पंजाब किंग्सचा सलग दुसरा विजय
प्रत्युत्तरात पंजाबने 210 धावांचं आव्हान एकतर्फी फरकाने पूर्ण केलं. पंजाबसाठी ओपनर प्रियांश आर्या याने 11 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. प्रियांशने या खेळीत 4 षटकार आणि 3 चौकार लगावले. प्रियांशचा साथीदार प्रभसिमरन सिंह याने 34 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 43 धावा केल्या. प्रियांश आणि प्रभसिमरन या सलामी जोडीने 61 धावांची भागीदारी केली.
कूपर कोनोलीने 36 धावा जोडल्या. कॅप्टन श्रेयस अय्यर याने अर्धशतक झळकावलं. श्रेयसने 29 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्ससह 50 रन्स केल्या. तर शशांक सिंह याने 14 आणि मार्कस स्टोयनिस याने 9 रन्स करत पंजाबला 5 विकेट्सने विजयी केलं. पंजाबचा हा सलग आण एकूण दुसरा विजय ठरला. पंजाबने याआधी 31 मार्च रोजी गुजरात टायटन्सवर 3 विकेट्सने मात केली होती.