
मुंबई: दादरच्या कबुतरखान्यावरील (Dadar Kabutar Khana) ताडपत्री हटवण्यासाठी जैन समाज आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन समाजाकडून काढण्यात आली आहे. अनेक महिलांनी कबुतरखान्यात घुसून ताडपत्री बांधलेली काढली. त्याचबरोबर कबुतरखान्यावर बांधण्यात आलेले बांबू देखील हटवण्यात आले आहेत. आज दादर कबुतरखान्याच्या परिसरात जैन समाजाकडून प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, आज सकाळीच काही जैन बांधवांनी आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करु, आम्ही कुठलीही जोरजबरदस्ती करुन ताडपत्री हटवणार नाही, असं म्हटलं होतं. मात्र, पालिकेने कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यापूर्वीच जैन समुदायाचा जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून काढून टाकली. जैन समाज आक्रमक होण्याबाबत आणि एकूणच निर्णयाबाबत याबाबत माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
किशोरी पेडणेकर या प्रकरणी एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या, याबाबत सरकार बॅकफूटवर का जात आहे? प्रत्येक गोष्टीत बॅकफूटवर जाऊन निर्णय घेत आहेत. मुळामध्ये कबुतराच्या विष्ठेमुळे दमा चालू होतो किंवा कोणते आजार होतात हे नक्की बरोबर आहे, आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यानुसार सुप्रीम कोर्टाचा अपमान होणार नाही अशा पद्धतीने पहिल्यांदा पर्यायी जागा देऊन त्यांना शिफ्ट करणं गरजेचं होतं. ज्या ठिकाणी मनुष्यवस्ती कमी आहे. जवळपास 93 वर्षाचा कबूतरखाना आहे, काल परवाच्या झोपडपट्टीला जर आपण संरक्षण देतो, तर यालाही संरक्षण दिलं पाहिजे. फक्त मनुष्यवस्तीपासून त्याला लांब नेता येईल का? त्यांचा दाणापाणी थांबून चालणार नाही, ज्या क्रूर पद्धतीने सर्व काही झालं, त्याबाबतीत जैन समाज अगदीच हळवा झाला आहे. समाजा-समाजामध्ये अशा तेढ निर्माण होतील. त्याबाबतीत पर्याय व्यवस्था द्या. त्यांचा जीव वाचवा. त्यांनाही पर्याय व्यवस्था देऊन दानापाणी द्या आणि मनुष्यवस्ती पासून लांब घेऊन जा. तुम्हाला कोणी अडवलं आहे का. दादागिरी कराल तर असा प्रत्येक समाज सरकारच्या अंगावर येणार आहे. ही मस्ती होते मग. तुम्ही सुप्रीम कोर्टाला समजावायला पाहिजे होतं. आम्ही पर्याय व्यवस्था देतो यांचा दाणापाणी चालू ठेवतो. मनुष्यवस्ती पासून लांब नेतो, असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
अनेक अशी ठिकाण आहे, जी मनुष्यवस्ती पासून लांब आहेत. शोधली तर मिळतील. त्यांचा दाणापाणी बंद केलं नाही पाहिजे. त्यांनी भावनेला हात घातल्यासारखा झालं. प्रत्येक समाजाच्या भावना लक्षात घेऊन आणि प्राणीमात्रावरती लक्ष देऊन ते करायला पाहिजे होतं. प्रत्येक वेळी सरकार बॅकफूटवर जात आहे. याचा विचार होत नाही का? की फक्त आमदार कुठे फोडायचे? कसे फोडायचे? कधी न्यायचे? किती पैसे द्यायचे? याच्यातच वेळ जातोय का? यामध्ये मध्यम मार्ग काढला पाहिजे, तोडगा निघाला पाहिजे असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे
कबुतरखाना ताडपत्रीने झाकून बंद केल्यानंतर जैन समाज नाराज
मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखाना ताडपत्रीने झाकून बंद केल्यानंतर जैन समाज नाराज झाला होता. याविरोधात जैन समाजाने मोर्चाही काढला होता. तर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही दादर कबुतरखाना बंद होऊ नये, यासाठी कंबर कसली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, कालिदास कोळंबकर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कबुतरखाने बंद करु नयेत, असे आदेश महापालिकेला दिले होते.
कबुतरखाना का बंद केला?, कारणे काय?
गेल्या अनेक महिन्यांपासून दादरमधील कबुतरखाना हटवण्याची मागणी होत आहे. हा कबुतरखाना दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे. हा कबुतरखाना दादरची ओळख बनला होता. मात्र, याठिकाणी येणाऱ्या कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्याचे समोर आले होते. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या होत्या. याशिवाय, हा कबुतरखाना रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हा कबुतरखाना हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती.
कबुतरांमुळे मानवांमध्ये धोकादायक होतात आजार
कबुतर मानवांमध्ये काही विशिष्ट आजार पसरवू शकतात, जे त्यांच्या विष्ठेद्वारे (बीट), पिसे, शरीरातून बाहेर पडणाऱ्या धुळीच्या कणांद्वारे किंवा परजीवींद्वारे पसरतात. त्यांना झुनोटिक आजार म्हणतात, म्हणजेच प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारे आजार. यामध्ये क्रिप्टोकोकोसिस, हिस्टोप्लाज्मोसिस सायटाकोसिस किंवा पोपट ताप, साल्मोनेलोसिस, एव्हीयन माइट इन्फेस्टेशन आणि टॉक्सोप्लाज्मोसिस सारखे आजार समाविष्ट आहेत.
आणखी वाचा