
मुंबई : छत्रपती शिवाची महाराज टर्मिनस, मुंबई येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. जीआरपीने दाखल केलेल्या गुन्ह्या विरोधात सीएसएमटी स्थानकात आंदोलन करण्यात आलं आहे. मुंबईत सायंकाळच्या वेळी आंदोलन करण्यात आल्यानं रेल्वे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार 5.50 पासून लोकल सोडण्यात आलेल्या नव्हत्या. मात्र, सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांपासून लोकलची वाहतूक सुरु करण्यात आल्याची माहिती आहे.
पिक आवर मध्ये लोकल थांबल्याने प्रवासी खोळंबले होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा परिणाम मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवर झाला.रेल्वे कर्मचाऱ्यांच्या यूनियनचा संप सुरु असल्यानं 50 मिनिटं लोकल बंद होत्या. त्यामुळं लोकल 40 ते 45 मिनिटं उशिरानं धावत आहेत.
आंदोलन का करण्यात आलं?
मुंब्रा इथे झालेल्या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी 2 अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले, त्याच्या विरोधात रेल्वे कर्मचारी संघटना आज आंदोलन करत आहेत. यामध्ये NRUM कडून आज संध्याकाळी मोर्चा काढण्यात आला, त्यानंतर लोकल देखील सोडण्यात आल्या नाहीत, मोटर मन देखील यात सहभागी झाले होते. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सीएसएमटी स्थानकात उभ्या होत्या. रेल्वे प्रशासनाचे रेल्वे युनियन सोबत बोलणे सुरू आहे, लोकल सोडण्यात यव्या यासाठी बोलणी सुरू केली आहेत. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांच्या माहितीनुसार लोकल सुरु झाल्या आहेत. आंदोलकांसोबत बोलून गाड्या सुरु केल्या आहेत. डीआरएम, डीएम सरांसोबत बोलून हे आंदोलन थांबवण्यात आलं, असं स्वप्नील लीला म्हणाले.
जीआरपीनं अभियत्यांविरोधात दाखल केलेल्या केसच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं आहे. आता गाड्या सुरु झाल्या आहेत. पावणे सहा पर्यंत गाड्या थांबल्या होत्या. पावणे सात वाजता पुन्हा लोकल सुरु झाल्या आहेत. त्यामुळं लोकल सेवा उशिरानं सुरु राहील, असं रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला म्हणाले.
मुंब्रा अपघात प्रकरण काय?
9 जूनला मुंब्रा स्थानकाजवळ एक अपघात झाला होता. त्या अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी झाले होते. त्या लोकल अपघाताचं कारण रेल्वे अभियंत्यांनी पावसामुळं खचलेल्या जागेचं काम वेळेत न करता दुर्लक्ष केल्यानं अपघात झाल्याचं एफआयरमध्ये म्हटलं होतं. या प्रकरणी दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
आणखी वाचा