Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच विरारमध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळं संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघालं. भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर बविआ अर्थात बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप केला.
विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी असा संतप्त सूर बविआकडून आळवण्यात आला. हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur) यांनी तावडेंवर पैसे वाटपाचे आरोप करत विरारमध्ये एकच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण घटनेमुळं राजकारण तापलं आणि राजकीय वर्तुळातून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली.
तावडेंना घेरलेल्या बविआ समर्थकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेतेमंडळींसह सेलिब्रिटी वर्तुळातूनही परखड मत मांडणाऱ्या काही चेहऱ्यांनी झाल्या प्रकरणावर व्यक्त होत अतिशय सूचक शब्दांमध्ये पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं. लेखच अरविंद जगताप आणि अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे ही त्यातलीच काही नावं.
विरारमध्ये झालेल्या गोंधळानंतर जगताप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ‘अध्यात्मिक’ पोस्ट केली. त्यांच्या या पोस्टमधील शब्द मात्र इतके सूचक ठरले, की घडल्या प्रकरणावर ते अचूकरित्या भाष्य करताना दिसले. ‘अध्यात्मिक… देवाला प्रसाद चालतो, विनोद नाही’ असं अरविंद जगताप यांनी लिहिलं आणि त्यांच्या या पोस्टवर लगेचच नेटकऱ्यांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. थेट कोणाचाही उल्लेख न करता, घडल्या प्रकरणावर सूचक प्रतिक्रिया देण्याच्या त्यांच्या या शैलीचा रोख नेमका कोणाकडे होता हे अनेकांनीच हेरल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
तिथं अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशा अष्टपैलू भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या हेमंत ढोमे यानंही घडल्या प्रकरणावर एक पोस्ट केली. ‘निवडणूक, लोकशाही हे सारं म्हणजे… ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’ तून महाराष्ट्राला सोडवा! ‘, अशी X पोस्ट त्यानं लिहिली.
हेमंतनं या पोस्टसह #कोणाचा_गेम_कोणाला_फेम #वसईविरार #vasaivirar असे थेट हॅशटॅग जोडत या राजकीय घडामोडीवर आपली प्रतिक्रिया दिली. त्याच्या या पोस्टला हजारो शेअर्सही मिळाले.
निवडणूक, लोकशाही हे सारं म्हणजे…
‘विनोद’ नाही गड्या!
मंडळी उद्या विचार करून मतदान करा!
यांच्या ‘तावडे’ तून महाराष्ट्राला सोडवा! #कोणाचा_गेम_कोणाला_फेम #वसईविरार #vasaivirar #MaharahstraElection2024
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 19, 2024
दरम्यान, एकिकडे कलाकारही पैसे वाटप प्रकरणी व्यक्त होत असताना खुद्द विनोद तावडे यांनीसुद्धा आपली बाजू स्पष्ट केल्याचं पाहायला मिळालं. ‘वाड्यावरुन परतत असताना नालासोपारा येथे मतदानाच्या आदल्या दिवशी आचारसंहितेचे नेमके काय नियम आहेत हे मी कार्यकर्त्यांना समजावून सांगत होतो. तेव्हा हितेंद्र ठाकूर यांना मी पैसे वाटतोय असा समज झाला. निवडणूक आयोगानं याची निष्पक्ष चौकशी करावी’, असं ते म्हणाले होते. दरम्यान, आचारसंहिता सुरू असताना तावडेंनी पत्रकार परिषद घेत दिलेल्या या स्पष्टीकरणाप्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाल्याचं वृत्त यावेळी समोर आलं.