
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून मुघलांच्या सत्तेतून सामान्य जनतेची मुक्तता केली आणि रयतेचे राज्य निर्माण केले. अशा महान व्यक्तिमत्त्वाची तुलना टिपू सुलतान यांच्याशी करणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले. दोघांना समान सन्मान द्यावा असे विधान करणे योग्य नसल्याचे सांगत, अशा प्रकारची विधाने सहन केली जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, या वक्तव्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.