
बीड: मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुनच रचण्यात आल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिलेली, अडीच कोटींची डील झाल्याचंही पाटील यांनी म्हटलं होतं. त्याच अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी परळी येथील जगमित्र कार्यालयातून पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडन केले. मी गेली 30 वर्षे सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि अण्णांनी जात-पात (Maratha) पाहिली नाही. मी आजवर कधीही जात पाहून काम केले नाही, असे म्हणत धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देण्यास सुरुवात केली.
मी 5 वर्षे विरोधीपक्षनेते म्हणून काम केले, त्यावेळी मी मराठा आरक्षणासाठी सभागृह बंद केले. नगर जिल्ह्यातील कोपर्डीला मी पहिली भेट दिली, त्यावेळी आरोपीला अटक होईपर्यंत मी सभागृह चालू दिले नाही. बीड जिल्ह्यात 80 हजार कुणबी प्रमाणात मी वाटले. मनोज जरांगे यांचे उपोषणही मी सोडले आहे, 17 तारखेची सभा सोडली तर मी एकदाही त्याच्यावर आरोप केले नाहीत, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले. तसेच, मनोज जरांगेना वाटते धनंजय मुंडे या पृथ्वीतलावर नसावेत. मराठा समाजाला ओबीसी की ईडब्लूएसमधून आरक्षण आहे, याचे उत्तर आणखी जरांगे यांनी दिले नाही. छत्रपती शिवरायांनी घालून दिलेली पद्धत लोक विसरत आहेत, आपल्याला सर्वांना एकत्र येऊन घडी पुन्हा बसवायची आहे, असेही धनंजय मुंडेनी म्हटले.
जरांगे तारीख आणि जागा तुम्ही सांगा
आता तयार झालेली, घरं जाळण्यासाठी येणारी ही पिलावळ कोणाची आहे, आम्हाला कोणीही काही बोललं तरी आम्ही गप्प बसतो, मला तर तलवार घेऊन मारायाला आले होते पण मी दुसऱ्यादिवशी त्यांची गळाभेट घेऊन त्यांना परत पाठवलं. जरागेंनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, कधीय तुमची तयारी. सध्या ईडब्लूएस की ओबीसीमध्ये जास्त आरक्षण मिळतं हे समोरासमोर होऊन जाऊ द्या, तारीख तुम्ही सांगा, जागा तुम्ही सांगा अख्खा महाराष्ट्र बघेल, असे आव्हानच धनंजय मुंडेंनी जरांगे पाटील यांना दिले. तुम्ही हाके, वाघमारे यांना मारलं, ही प्रवृत्ती कोणाची आहे. तुम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लाऊ नका इतकंच आमचं म्हणणं आहे. मी अनेकांना बाजूला जाऊन भेटतो, यातून काय कट रचला जातो, हे सगळे तुमचे कार्यकर्ते आहेत. पण, माझी अशी इमेज तयार केली जात आहे, असे धनंजय मुंडेंनी म्हटले.
माझी अन् जरांगेंची नार्को टेस्ट करा
या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे अशी मागणी आहे. माझी ब्रेन मॅपिग, नार्को टेस्ट करा जरांगे आणि आरोपींचीही करा. मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांनाही अशा भाषेत बोलायचे ही पद्धत आहे का? असे धनंजय मुंडेंनी म्हटले. आज एआयने सर्व काही करता येते, माझा फोन नेहमी सुरू असतो. कुणाचीही अडचण सोडवण्यासाठी मी फोन सुरू ठेवत असतो. मनोज जरांगे हे तुम्हाला सगळे महागात पडणार आहे, मला ठराविक जातीच्या व्यासपीठावरुन लाथा मारून बाहेर काढले होते, मराठा आरक्षणात 500 जणांचा जीव गेला, हे ईडब्लूएसमधून वाचले असते, असेही मुंडेंनी म्हटले.
तुमच्या मेव्हण्याचे वाळूचे किती ट्रक पकडले
अंतरवालीतून समाजात अंतर पाडले गेले, तुमच्या मेहुण्याचे किती वाळूचे ट्रक पकडले गेले, पण माझ्यावर असे काही करायचे संस्कार नाहीत. तुम्ही ओबीसीच घेऊ नका, ईडब्लूएसमधून घ्या. मनोज जरांगेना आता शेतकरी नेता व्हायचं आहे, वंजारी जातीचे बीज ठेवायचे नाही ही धमकी कोणी दिली, मला गोळ्या घाला आणि संपून टाका, फक्त तुम्ही राहा, असा टोलाही जरांगे पाटलांना लगावला. दरम्यान, मी माझ्या वकिलाशी चर्चा करून मानहानीच्या दाव्याबाबत चर्चा करणार आहे, असेही मुंडेंनी म्हटलं.
हेही वाचा
आणखी वाचा