कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंधरा ऑगस्ट रोजी महानगरपालिका क्षेत्रात कत्तलखाने आणि मांसविक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे. उपायुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, चौदा ऑगस्टच्या रात्री बारा वाजल्यापासून पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजेपर्यंत सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने तसेच मांसविक्रीची दुकाने बंद राहतील. या निर्णयामुळे शहरात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. शहरात रस्त्यांवरील खड्डे, वाहतुकीची कोंडी, वाढते प्रदूषण, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांमुळे होणारी बजबजुरी असे अनेक गंभीर प्रश्न असताना, महानगरपालिकेने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय नागरिकांच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर परिणाम करतो का, यावर विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.