
दिल्ली: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावरती आहेत, अशातच ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत, आज दुपारी एक वाजता एकनाथ शिंदे अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. शिंदे आधी एक वाजता अमित शाहांची भेट घेणार आहेत, त्यानंतर ते नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी जाणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही दुसरी दिल्ली वारी आहे. सातत्याने ते दिल्लीतील नेत्यांशी गाठीभेटी घेत आहेत. त्याचबरोबर ते एनडीएच्या पक्षातील बड्या नेत्यांची देखील भेट घेत आहेत, अशी सुत्रांची माहिती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि काही बाबतींमध्ये शिवसेनेची असलेली नाराजी यांच्या पार्श्वभूमीवरती या बैठका आणि गाठीभेटी महत्त्वाच्या आहेत, त्याचबरोबर भाजप नेते परिणय फुके यांनी केलेल्या शिवसेनेबद्दलच्या विधानानंतर असलेली नाराजी देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
काल एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचले आहेत. त्यानंतर आज त्यांची एक वाजता महत्त्वाची बैठक आहे, ते आज दुपारी एक वाजता अमित शहा यांना भेटणार आहेत, शाह यांच्या घरीच ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. अमित शहा यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी यांची भेट घेतील, त्यांच्याबरोबर देखील एक बैठक नियोजित आहे अशी सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता भाजपच्या वरिष्ठ आणि सर्वोच्च नेत्यांच्यासोबत आज एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे, त्याचं कारण शिवसेना एनडीएचा घटक पक्ष आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे, त्या संदर्भात ही बैठक होईल असं सांगितलं जात आहे. मात्र, या बैठकीमध्ये अनेक राजकीय विषय निघण्याची शक्यता आहे, त्यामुळे आजच्या या भेटीनंतर आणि चर्चेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर काही बदल होतात का? शिवसेनेमध्ये काही महत्त्वाचे बदल होतात का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्याआधी एकनाथ शिंदे दिल्लीत आले
शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत येत आहेत. मात्र, त्यांच्या एक दिवस आधी एकनाथ शिंदे दिल्लीत येत असल्याने आणि नेत्यांच्या गाठीभेटी घेत असल्याने ते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत. उद्धव ठाकरे दिल्लीत त्यांच्या खासदारांसोबत बैठक घेणार आहेत, त्याचबरोबर ते राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या दुपारच्या जेवणालाही उपस्थित राहतील.
एकनाथ शिंदे हे आठवडाभरापूर्वीही होते दिल्लीत
यापूर्वी, गेल्या आठवड्यातही, एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक नियोजित होता. महाराष्ट्र मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत त्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदेंचा पुन्हा एकदा दिल्ली दौरा चर्चेत आला आहे. मागील आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केल्यानंतर पुन्हा एकदा आता एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करत आहे. काल (मंगळवारी) रात्री आठ वाजता एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले, 10 वाजता पोहोचले तर आज दुपारी मुंबईत परततील. या दरम्यान एकनाथ शिंदे पुन्हा एकदा खासदारांसोबत बैठक घेणार असून इतर काही एनडीए नेत्यांना सुद्धा भेटणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
आणखी वाचा