
Eknath Shinde on Raj Thackeray and Uddhav Thackeray : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठं वक्तव्य केलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेबाबत भाष्य केलंय.
राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत जाणार असे चित्र गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाले आहे. याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, राजकारणामध्ये कोणी कोणाही बरोबर जाऊ शकतो. कोणी कोणाबरोबरही युती करू शकतो. तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. आमची महायुती आहे. महायुतीत आम्ही लोकसभा जिंकली. महायुतीने विधानसभा जिंकली आणि महायुती स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई महापालिका महायुतीच जिंकणार
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईचे काय होणार? असे विचारले असता एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की, मुंबई महापालिका महायुतीच जिंकणार. कारण आमचे सरकार आल्यानंतर, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी आणि आम्ही मुंबईसाठी जे निर्णय घेतले ते आतापर्यंत कोणीही घेतलेले नाहीत. खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्धार आम्ही केला. दोन फेजमध्ये काम सुरू आहे. पुढच्या दीड दोन वर्षात तुम्हाला मुंबईत खड्डा सापडणार नाही. हे काम अगोदर व्हायला हवे होते. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण प्रत्येक वार्डात केला आहे. लोकांना आम्ही अनेक सुविधा देत आहोत. मुंबईत सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. एसआरएमध्ये रखडलेले प्रकल्प, म्हाडामध्ये रखडलेले प्रकल्प आम्ही क्लस्टरच्या माध्यमातून करत आहोत. मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा आम्ही मुंबईत आणणार आहोत.
मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. जगातले लोक मुंबईमध्ये येतात. मुंबईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आम्हाला मदत करत आहेत. ते देखील महाराष्ट्राच्या पाठीशी आहे. त्यांच्या प्रत्येक अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरभरून मदत त्यांनी केलेली आहे. त्यामुळे मुंबईकरांना माहित आहे की, आपलं सरकार आल्यानंतर काय-काय सुरू झाले. आम्ही अडीच वर्ष केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत आम्हाला दिली. आतापर्यंतच्या इतिहासात 232 जागा महायुतीला मिळाल्या, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विकास हाच आमचा अजेंडा
ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईच्या निकालात त्याचा काही फरक पडेल का? असे विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, आनंद आहे. कुटुंब एकत्र आले तर चांगलीच गोष्ट आहे. राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे. परंतु आम्ही महायुती म्हणून जे काम केलेले आहे. विकास प्रकल्प आम्ही युद्ध पातळीवर पुढे नेले. शेवटी लोकांना काम पाहिजे. लोकांना विकास पाहिजे आणि विकास हाच आमचा अजेंडा आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा