नागपुरात कडाक्याच्या थंडीत आमदार निवासातला गिझर बंद झाला. त्यामुळं आमदार मंडळींच्या पीएसोबत आमदार मंडळी सुरुवातीला गारठली. आणि नंतर गैसोयीवरुन पेटून उठली. या आमदार मंडळींना आणि राज्य सरकारला आम्ही वेळेत वीज न मिळाल्यानं काय त्रास भोगावा लागतो, त्याची खरी उदाहरणं दाखवतो. सुरुवातीला जाऊयात परभणी जिल्ह्यातील पिंगळी गावात. इथं रात्रीचे 11 वाजलेत. पारा फक्त 4 अंशावर आहे. बोचऱ्या थंडीत पिंगळी गावचे तरुण शेतकरी माऊली डुबे शेताला पाणी द्यायला निघालेत. हाडं गोठवणाऱ्या थंडीत शेतात जाऊन पाणी देण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय नाही कारण दिवसा शेतीसाठी वीजच मिळत नाही.
धुळ्यात देखील हे कापडणे गावचे अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र माळी हे वय झालं तरी घर जगवण्यासाठी त्यांना रात्री 4 अंश सेल्सियस तापमानात मुलासोबत शेतावर जावं लागतं. रात्री 11 नंतर लाईट येते. नंतर रात्रभर शेतात पाणी भरतात.
राजेंद्र माळींची जी व्यथा तीच कथा आबा माळींची. शेतात गहू हरभरा लावलाय. दिवसा शेताची मशागत आणि रात्री पाणी द्यायला पुन्हा शेतातच मुक्काम. यात माळींना घरचा रस्ताच दिसेनासा झालाय. रात्रीच्या वेळी शेताला पाणी देताना विंचवा-काट्याची भीती असते ती वेगळीच. मात्र करणार काय, काही गुंठाभर शेतावर पोरांची वीतभर पोटं पण भरायचीयत ना. राज्य सरकारला इतर मुद्द्यांमध्ये सध्या शेतकरी आणि त्याची ही वीजेची समस्या दिसत नाहीय. म्हणून झी 24 तासनेच रात्रीच्या अंधारातला शेतकऱ्याचा वीजेअभावी चाललेला संघर्ष दाखवायचा ठरवलं. किमान माध्यमांच्या कॅमेरातून तरी शेतकऱ्यांचे खरे प्रश्न विधीमंडळाच्या सदनात पोहोचतील.
मागेल त्याला कृषीपंप फक्त घोषणाच
खरंतर 2 वर्षापूर्वी फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ असं आश्वासन दिलं. मार्च 2023 ला 40 % कृषी फिडर सौर ऊर्जेवर येणार असं जाहीर केलं. ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा देण्याची घोषणा केली. मागेल त्याला कृषीपंप देऊ असं अजित पवारांनी अर्थसंकल्पात जाहीर केलं. पण सहा सहा महिने उलटले तरी शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प मिळत नाही हे कडवट वास्तव आहे.
खतांच्या वाढलेल्या किंमती, शेतमालाला मिळणाऱ्या अनिश्चित किंमती, हमीभाव नसल्यानं पडलेले दर या सगळ्यात दिवसा शेतीसाठी वीज न मिळणं ही सगळी संकटं शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजली आहेत. विजेअभावी एक दिवस गिजर बंद झाला तर दोन दोन आमदार तक्रार करतात.. मात्र ज्या शेतकऱ्यानीच निवडलेले नेतेमंडळी मात्र बाकीच्या राजकारणात दंग असतात. तेव्हा मायबाप सरकार आतातरी शेतकऱ्यांकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.