
Ganpati visarjan 2025 Rain: तमाम महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत असलेल्या गणरायाला शनिवारी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर निरोप दिला जाणार आहे. आज मुंबईतील तब्बल 6500 सार्वजनिक मंडळे व दीड लाख गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका (ganesh immersion 2025) आज निघणार आहेत. विसर्जन मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त (Mumbai Police) तैनात राहणार असून गर्दीच्या ठिकाणी एकूण 10 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तब्बल 25 हजार पोलीस कर्मचारी डोळ्यात तेल घालून पहारा देतील. तर मुंबई महानगरपालिकेचे 10 हजार कर्मचारीही तैनात असतील. यंदा गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पावसाची (Mumbai Rain) हजेरी लागण्याची शक्यता आहे. कालपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत सतत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज पहाटेपासून मुंबईत पावसाची संततधार आहे. मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केल्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी मुंबईत कालप्रमाणेच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईत रिमझिम पाऊस पडेल तर मुंबई उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. शुक्रवारप्रमाणेच शनिवारीही पावसाचे वातावरण कायम राहील. सोमवारनंतर मात्र पाऊस उघडीप देईल, असा अंदाज आहे. त्यामुळे आज गणपती विसर्जन मिरवणुकीत पावसाची हजेरी एकीकडे नाचणाऱ्यांचा आनंद द्वगुणित करणारी असेल. मात्र, त्याचवेळी सतत पाऊस सुरु राहिल्यास गणपतीच्या मूर्त्यांना झाकून न्यावे लागेल. तसेच गणपतींच्या प्रवासाचा वेगही मंदावण्याची शक्यता आहे.
मुंबईत गणेशगल्लीचा गणपती अर्थात मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणारा गणपती सर्वात आधी विसर्जनासाठी लागेल. त्यानंतर लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, अंधेरीचा राजा आणि लालबाग व परळ परिसरातील मानाचे इतर गणपती विसर्जनासाठी मंडपातून निघतील. लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक ही सर्वाधिक आकर्षणाचा विषय असेल. लालबागचा राजा आज दिवसभर आणि रात्रभर फिरुन रविवारी सकाळी गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल होईल.
आणखी वाचा
आणखी वाचा