
सोने आणि चांदीत स्वस्ताईImage Credit source: टीव्ही ९ मराठी
किशोर पाटील/ प्रतिनिधी: साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडव्याच्या आज सण आहे. सोन्या चांदीच्या खरेदीला आज विशेष महत्त्व असते. आजच्या दिवशी सोनं चांदी खरेदी केलं तर शुभ असते, घरात वर्षभर बरकत असते अशी नागरिकांची भावना आहे. आज सणासुदीच्या दिवशीच सोने आणि चांदीने स्वस्ताईची गुढी उभारली. दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी घसरण झाली. एरव्ही सणाच्या दिवशी मौल्यावान धातुच्या किंमतीत मोठी वाढ होते. पण गुढीपाडव्याला सोने आणि चांदीने ग्राहकांना आनंदवार्ता दिली. बाजारात बेशकिंमती धातुच्या किंमती (Gold And Silver Rate) घसरल्याची वार्ता येऊन धडकल्याने ग्राहकांची गर्दी उसळली.
एका वर्षात सोन्यात 70 हजारांची महागाई
आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 58 हजार 105 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 57 हजार 500 रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात तब्बल 70 हजार रुपयांपर्यंत तर चांदीमध्ये तब्बल दीड लाख रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याला सोने चांदी खरेदीचा मुहूर्त साधताना ग्राहकांचे बजेट कोलमडल्याच पाहायला मिळत आहे. वर्षभरात डोनाल्ड ट्रम्प यांचं टेरीफ संदर्भातलं धोरण, रशिया युक्रेन युद्ध याबरोबरच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्या-चांदीच्या दरावर मोठा परिणाम दिसून आला. सोन्या आणि चांदीच्या वाढीसाठी 2025 हे वर्ष ऐतिहासिक वर्ष ठरलं असं सराफ व्यावसायिकांनी सांगितलं.
सोन्या-चांदीच्या दरात वाढीची भीती
2026 च्या दुसऱ्या महिन्यात अखेरीस अमेरिका व इराण यांच्यात सुरू झालेल्या सुरू झालेल्या युद्धाच्या परिणामामुळे सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. युद्ध थांबल्यानंतर पुढच्या काळामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ होऊ शकते अशी शक्यता सराफ व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी दर घसरणीचा आनंद हा औटघटकेचा ठरतो की काय अशी चर्चा रंगली आहे.
आज सराफा बाजारात मौल्यवान धातुत घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण दिसून आली. गुढीपाडव्याच्या दिवशी मौल्यवान धातुत मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण दिसली. आज गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 075 रुपयांवर पोहचले. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 53 हजार 380 रुपयांवर पोहोचले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अवघ्या 24 तासात सोन्याच्या दारात 4 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 13 हजार रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. अमेरिका इराण युद्धाचा परिणाम झाला असून गेल्या 18 दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार सुरू आहे.