
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत असून नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. सपकाळ यांनी आरोप केला की, जर या प्रकरणाची प्रामाणिक चौकशी झाली तर अनेक मंत्री आणि अधिकारी अडचणीत येऊ शकतात. त्यांनी सांगितले की, 2018 साली देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिरासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तसेच काही अधिकारी आणि नेत्यांचे खरातसोबत जवळचे संबंध असल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय, काही प्रमुख नेत्यांचे या भोंदूबाबासोबत फोटो समोर आल्याचेही त्यांनी नमूद केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पुजा केल्याची माहिती मिळते आहे. भोंदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा महिन्यांपासून माहित होते. सपकाळ यांनी पुढे असा आरोप केला की, या प्रकरणाची माहिती असूनही योग्य वेळी कारवाई करण्यात आली नाही. मात्र, नंतर राजकीय कारणांमुळे कारवाई सुरू करण्यात आली. या सर्व आरोपांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.