
Heavy Rain Maharashtra updates: राज्यातील बहुतांश भागात आज(26 जुलै) देखील मुसळधार पावसाच्या सरी कोसळताय. भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाज नुसार आज देखील अनेक भागात पहाटे पासून पाऊस (Maharashtra weather Update) कोसळतोय. अशातच मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा परिसरात आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवविला आहे. पुढील तीन ते चार तासांमध्ये या भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. असा इशारा हि देण्यात आला आहे. पुढील 3 ते 4 तासांत मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ, महाड-पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी
दरम्यान, विदर्भातील अनेक जिल्ह्यासह नागपुरातहि पावसाने आज सकाळपासून हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोबतच महाबळेश्वर परिसरात काल रात्री जास्त पाऊस झाल्याने सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पावसाचा जोर वाढल्यास सावित्री नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड-पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. अतिवृष्टीच्या कारणास्तव हा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला असून महाड व पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट, नागरिकांनाही सतर्क राहण्याचा आवाहन
अशातच, पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पाऊस आहे तो सातत्याने सुरू आहे. आज ही पालघर मध्ये पावसाचा जोर कायम असून पहाटेपासूनच पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. आज पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट घोषित असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एकूणच पाहायला गेलं तर हा पाऊस गेले काही दिवस सातत्याने सुरू असताना शेतीच्या कामाला सुद्धा वेग आला असून 80 टक्के भात रोपण्या आहेत, त्या पूर्ण करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील नदी नाल्यांना सुद्धा पावसामुळे पूर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांनाही सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आला आहे.
विदर्भासाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी, वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
दरम्यान, विदर्भातील चंद्रपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि अमरावती या पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल दिवसभर झालेल्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क जवळच्या तालुक्यांशी किंवा जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला असून आज पुन्हा दमदार पाऊस झाल्यास स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातूनही सतत पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामुळेही वैनगंगा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. नागपुरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून हलक्या स्वरूपाचा पाऊस सतत होत आहे.
मुंबईमध्ये आज मुसळधार पावसासह समुद्रात उंच लाटांचा इशारा
मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ढगाळ आकाश आणि समुद्रात उंच लाटांचा इशारा दिला आहे. दुपारनंतर शहरात जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात असा अंदाज ही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मुंबईतील पूर्व उपनगरात ढगाळ धूसर वातावरण झाले आहे तर पावसाची रिमझिम सुरू आहे.
हेही वाचा:
आणखी वाचा