
India vs Pakistan Cricket National AnthemImage Credit source: Surjeet Yadav/MB Media/Getty Images
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 15 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्याची क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा आहे. मात्र या स्पर्धेआधी पाकिस्तानने मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय. पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्धच्या या सामन्यावर बहिष्कार टाकल्याचं समोर आलं आहे. उभयसंघातील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र पाकिस्तान स्पर्धेतील उर्वरित सर्व सामने खेळणार असल्याचं स्पष्ट आहे.
पाकिस्तान सरकारने एक्स पोस्टमध्ये काय म्हटलंय?
पाकिस्तानचे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने हे सहयजमान श्रीलंकेत होणार आहेत. पाकिस्तान सरकारने पीसीबीला या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिलीय. मात्र त्यानंतरही पाकिस्तान टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यात खेळणार नाही. “पाकिस्तान क्रिकेट टीम 15 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार नाही”, अशी माहिती पाकिस्तान सरकारच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे देण्यात आली आहे. मात्र सामन्यावर बहिष्कारामागील कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
मुस्तफिजुरच्या हकालपट्टीनंतर घडामोडींना वेग
वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याच्या आयपीएलमधील हकालपट्टीनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अचानक सुरक्षेचं कारण पुढे करत भारतात वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं. बांगलादेशने त्यांचे सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात यावेत अन्यथा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भाषा आयसीसीसमोर केली होती. मात्र आयसीसीने इथेच भारतातच सामने खेळावे लागतील, असं बांगलादेशला ठणकावून सांगितलं. त्यानंतर बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे आयसीसीने बांगलादेशच्या जागी या स्पर्धेत स्कॉटलँडचा समावेश केला.
पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी याने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेऊ त्यांना हे सर्व प्रकरण सांगितलं. त्यानंतर पाकिस्तानही या स्पर्धेत खेळणार नसल्याची चर्चा रंगली होती. मात्र पाकिस्तानने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. मात्र त्यानंतर पाकिस्तानने अचानक टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
ए ग्रुपमध्ये दोन्ही संघ एकत्र
दरम्यान या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार हा 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान रंगणार आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, यूएसए, नेदरलँड्स आणि नामिबिया या संघांचा ए ग्रुपमध्ये समावेश आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ या मोहिमेतील आपला पहिल सामना हा 7 फेब्रुवारीला खेळणार आहेत. टीम इंडिया यूएसए तर पाकिस्तान नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे.