
टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 राऊंडमध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. त्याच टीमला दोन वर्षांपूर्वी हरवून भारताने टी20 वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं होतं. दक्षिण आफ्रिकेने त्यावेळी सुद्धा टीम इंडियाला कडवं आव्हान दिलं होतं. आता पुन्हा एकदा ते टीम इंडियासमोर अडचणी निर्माण करु शकतात. दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये यावेळी सुद्धा काही चांगले खेळाडू आहेत. त्याच टीममध्ये संपूर्ण टुर्नामेंटमध्ये फक्त 2 ओव्हर टाकणारा एक असा खेळाडू आहे, जो टीम इंडियासमोर अडचणी निर्माण करु शकतो. त्या 2 ओव्हरमध्ये त्याची धुलाई झाली. हा खेळाडू आहे, दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्करम.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आतापर्यंतच सर्वात मजबूत टी20 संघ मानला जातोय. वर्ल्ड कपच्या आधी टीम इंडियाचं प्रदर्शन पाहिलं, तर हा दावा चुकीचा वाटत नाही. म्हणून टीम इंडियाला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हटलं जातय. टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाने अजूनपर्यंत आपल्या पूर्ण क्षमतेनुसार खेळ दाखवलेला नाही. कमीत कमी बॅटिंगमध्ये तरी तसं प्रदर्शन दिसलेलं नाही. वेगवेगळ्या प्रसंगी कुठल्या ना कुठल्या फलंदाजाची बॅट तळपली आहे. पण अजूनपर्यंत एकत्र, कुठल्या टीमच्या गोलंदाजांवर तुटून पडलेले नाहीत.
कुठल्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचे फलंदाज लाचार?
टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरच्या संघर्षाची वेगवेगळी कारणं आहेत. पण यावेळी एक अशी कमतरता दिसली आहे, प्रत्येक मॅचमध्ये प्रतिस्पर्धी टीम त्याचा फायदा घेत आहे. ऑफ ब्रेक गोलंदाजीसमोर टीम इंडियाचे फलंदाज लाचार वाटतायत. गेरहार्ड इरासमस, आगा सलमान, सॅम अयूब, उस्मान तारिक आणि आर्यन दत्त सारख्या स्पिनर्सनी टीम इंडियाच्या फलंदाजांना हैराण केलय. खासकरुन अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव खूप संघर्ष करताना दिसतात. या गोलंदाजांनी फक्त धावाच रोखल्या नाहीत, तर विकेटही काढले.
पण एकही विकेट मिळाला नाही
भारतीय टीममध्ये लेफ्टी फलंदाजांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 22 फेब्रुवारीच्या संध्याकाळी भारतीय टीमचे फलंदाज बॅटिंगसाठी उतरतील, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन मार्करम त्यांना याच जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. त्याची जबाबदारी स्वत: मार्करम उचलेल. कारण तो ऑफ स्पिनर आहे. या वर्ल्ड कपमध्ये मार्करमची जितकी क्षमता आहे, तितका त्याने आपल्या कामचलाऊ फिरकीने तसा विशेष प्रभाव पाडलेला नाही. आतापर्यंत 4 सामन्यात त्याने 2 मॅचमध्ये गोलंदाजी केली. फक्त एक-एक ओव्हर टाकली. या 2 ओव्हरमध्ये त्याने 29 धावा दिल्या. पण एकही विकेट मिळाला नाही.