
IPL स्पर्धेसाठी आपल्याच देशाशी घेतला पंगा! आरसीबीच्या खेळाडूने क्रिकेट बोर्डाला खेचलं कोर्टातImage Credit source: IPL/BCCI
आयपीएल 2026 स्पर्धेची सुरूवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात आरसीबीने तगडी बॅटिंग लाइनअप असलेल्या सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं. यासह या स्पर्धेची सुरूवात विजयाने केली आहे. या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला असला तरी गोलंदाजीबी बाजून कमकुवत असल्याचं दिसून आलं. जोश हेझलवूड आणि नुवान तुषाराची उणीव प्रकर्षाने भासली. ही स्पर्धा जशी पुढे सरकेल तसं गोलंदाजीची बाजू भक्कम करणं आरसीबीला भाग आहे. असं असताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नुवान तुषारा फिटनेस टेस्टमध्ये फेल झाल्याने एनओसी देण्यास नकार दिला आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार, फिटनेस टेस्ट पास केली तर विदेशी लीग स्पर्धेत खेळता येणार आहे. त्यामुळे नुवान तुषाराने थेट कोर्टाची पायरी चढली आहे. त्याने न्यायालयात याचिका दाखल करत ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 9 एप्रिलला होणार आहे.
नुवान तुषाराच्या 1.6 कोटींचं काय होणार?
आयपीएल स्पर्धेत नुवान तुषारा हा आरसीबी संघाकडून खेळतो आणि मागच्या वर्षी त्याच्यासाठी 1.6 कोटींची बोली लावली होती. मागच्या पर्वात फक्त एकच सामना आरसीबीसाठी खेळला होता. तर हेझलवूडच्या गैरहजेरीत त्याची उणीव संघाला भासत आहे. असं असताना नुवान तुषारा अजूनही श्रीलंकेत आहे. तुषाराच्या मते, श्रीलंकन क्रिकेट बोर्डासोबतचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट हा 31 मार्चला संपला होता. पण असं असूनही श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने फिटनेसचं कारण देत ना हरकत प्रमाणपत्र दिलं नाही. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे 1.6 कोटीचं नुकसान होत असल्याचं तुषाराने याचिकेत नमूद केलं आहे.
नुवान तुषाराने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला काय सांगितलं?
नुवान तुषाराने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट घेण्यास नकार दिला आहे. त्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला स्पष्ट सांगितलं की, मला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नको. त्यामुळे त्याने आयपीएल खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तिलांजली दिली असंच म्हणावं लागेल. तुषारा श्रीलंकेचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याने श्रीलंकेसाठी 30 टी20 सामने खेळले असून 36 विकेट काढल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 8.1 रन प्रति षटक आहे. त्याची गोलंदाजी शैली लसिथ मलिंगाशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे त्याचा सामना करणं फलंदाजांना कठीण जातं. त्यात चेंडू बाहेर स्विंग करण्यात तरबेज असल्याने फलंदाज फटकेबाजी करताना चूक करतात.