Iran -Israel War : इराण-इस्रायल युद्ध तणावातही भारताला नो टेन्शन, इंधन पुरवठ्याबद्दल मोठी माहिती समोर

Iran -Israel War :  इराण-इस्रायल युद्ध तणावातही भारताला नो टेन्शन, इंधन पुरवठ्याबद्दल मोठी माहिती समोर
Iran -Israel War :  इराण-इस्रायल युद्ध तणावातही भारताला नो टेन्शन, इंधन पुरवठ्याबद्दल मोठी माहिती समोर


गेल्या आठवड्यापासून इराणवर इस्रायल -अमेरिकेने हल्ला चढवत युद्धाला तोंड फुटलं असून त्यामुळे जगात अशांतता आहे. या संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात अनिश्चितता वाढली असून अनेक देश चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र असं असलं तरी भारताला काही टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण भारतात इंधनाच्या बाबतीत तातडीची कोणतीही अडचण निर्माण होण्याची शक्यता नाही. केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेल (PPAC) यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारताची इंधन सुरक्षा सध्या मजबूत आहे.

मध्यपूर्वेतील तणाव, समुद्री मार्गांमधील अडथळे आणि जागतिक किमतींमधील चढउतार असूनही भारतातील इंधन पुरवठा स्थिर आहे. गेल्या दशकात तयार करण्यात आलेल्या दीर्घकालीन धोरणांमुळे ही स्थिरता शक्य झाली आहे, असे PPAC ने अहवलात म्हटलं आहे.

कच्चं तेल व पेट्रोलियमचा देशात किती साठा ?

भारताकडे सध्या कच्चं तेल आणि शुद्ध केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा, एकत्रित साठा हा 250 दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त आहे, म्हणजेच सुमारे 4 हजार कोटी लिटर इतका हा साठा आहे.  एकूण 7 ते 8 आठवडे, देशाच्या इंधन गरजा पूर्ण करण्यास हा साठा सक्षम असल्याचंही PPAC च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय, भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण क्षमतेचा देश आहे. देशाची वार्षिक शुद्धीकरण क्षमता 258 दशलक्ष मेट्रिक टन आहे. देशांतर्गत वापर सुमारे 210-230 दशलक्ष मेट्रिक टन असल्याने शुद्धीकरण क्षमता गरजेपेक्षा जास्त आहे.

हॉर्मूज सामुद्रधुनीवर अवलंबित्व नाही

भारताने गेल्या काही वर्षांत कच्च्या तेलाच्या आयातीचे स्रोत मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. पूर्वी सुमारे 27 देशांकडून तेल आयात होत होते, तर आता तब्बल 40 देशांकडून तेल आयात केलं जातं. यामुळे तेलासाठी हॉर्मूज सामुद्रधुनीच्या
मार्गावर पूर्ण अवलंबित्व राहिलेलं नाहीये. भारत जे कच्चं तेल आयात करतो, त्या आयातीपैकी फक्त 40 % तेल या मार्गाने येते, तर उर्वरित 60% तेल हे इतर मार्गांनी येतं. त्यामुळे एखादा मार्ग बंद झाला तरी देशात इंधन टंचाई होण्याची शक्यता कमी आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढ भारतात तुलनेने कमी

गेल्या चार वर्षांत जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. उदाहरणार्थ,

पाकिस्तान मध्ये पेट्रोल दर सुमारे 55% वाढले, तर जर्मनी मध्ये 21 %, फ्रान्स मध्ये 19 % वाढ झाली होती. मात्र त्याच कालावधीत भारतात पेट्रोलची किंमत 0.67 टक्क्यांनी कमी झाली, तर डिझेलची किंमत फक्त 1.15 टक्क्यांनी वाढली. यावरून इंधन दर स्थिर ठेवण्यात भारताचे धोरण प्रभावी ठरल्याचे दिसते.

एथेनॉल मिश्रणामुळे तेलावरील अवलंबित्व कमी

भारतामध्ये 20% एथेनॉल मिश्रण कार्यक्रम राबवला जात असून त्यामुळे दरवर्षी कच्च्या तेलाचा वापर सुमारे 6 दशलक्ष टन कमी होतो. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास देखील मदत होते.

शेजारी देशांच्या तुलनेत स्वस्त LPG

भारतामध्ये एलपीजीचे दरही अनेक शेजारी देशांच्या तुलनेत कमी आहेत. उदाहरणार्थ, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थ्यांसाठी 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत सुमारे 553 रुपये आहे. त्या तुलनेत पाकिस्तानमध्ये सिलिंडरची किंमत 1054 रुपये, श्रीलंकेत 1239 रुपये आणि नेपामध्ये हीच किंमत 1195 रुपये इतकी आहे असे अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

एकूणच, जागतिक अनिश्चितता असूनही भारताने आपली ऊर्जा व्यवस्था मजबूत केली आहे आणि दीर्घकालीन धोरणांमुळे देशाला ऊर्जा पुरवठा आणि किंमत स्थिरता राखण्यास सक्षम केलं आहे याची पुष्टी अहवालातून होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *