
Jai Jawan Govinda Pathak Pro Govinda 2025 मुंबई: सरनाईकांकडून (Pratap Sarnaik) दरवर्षी प्रो गोविंदा ही स्पर्धा खेळवली जाते. यंदा 7,8 आणि 9 ऑगस्ट रोजी प्रो गोविंदा स्पर्धा (Pro Govinda 2025) रंगणार आहे. मात्र या स्पर्धेआधीच प्रो गोविंदाची चर्चा रंगली आहे. प्रो-गोविंदा स्पर्धेत संधी न दिल्यामुळे जय जवान गोविंदा पथकाने (Jai Jawan Govinda Pathak) नाराजी व्यक्त केली आहे. आयोजकांनी राजकारण करुन आम्हाला बाहेर काढल्याचा आरोपही जय जवान पथकानं केला आहे. याच जय जवान गोविंदा पथकाने मुंबईत झालेल्या ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात थर लावून सलामी दिली होती. त्यामुळे जय जवान गोविंदा पथकाला ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सलामी देणं नडलं की काय, अशी चर्चा रंगली आहे. मात्र जय जवानच्या या आरोपावर आता प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय.
प्रो गोविंदा सीझन 3 च्या नोंदणी प्रक्रियेत राज्यभरातून एकूण 127 गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला. खेळाच्या नियमानुसार जे सर्वात पहिले ३२ संघ नोंदणी करतील त्यांना या स्पर्धेत स्थान दिले जाईल, असे स्पष्ट केले होते. तरी देखील राजकारण करून आयोजकांनी आम्हाला बाद केले अशी बदनामी जय जवान गोविंदा पथक करत आहे. या त्यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही. निवड प्रक्रिया ही केवळ नियमांनुसार केली जाते, अशी स्पष्ट भूमिका प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी मांडली.
सर्व प्रथम नोंदणी केलेल्या 32 संघांना सीझन 3 मध्ये खेळण्याची संधी-
प्रो गोविंदा सीझन 3 साठी नोंदणी केलेले संघ हे दापोली, रत्नागिरी, सांगली, वसई, विरार,पालघर, मुंबई, ठाणे असे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत. सर्व प्रथम नोंदणी केलेल्या 32 संघांना सीझन 3 मध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. जय जवान गोविंदा पथक जो आमच्यावर आरोप करत आहेत, त्यांचा नोंदणी प्रक्रियेतील क्रमांक 41 स्थानावर होता. मागील वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बालवीर गोविंदा पथक 37 व्या क्रमांकावर होता असे अनेक गोविंदा पथकं आहेत जी यापूर्वी प्रो गोविंदामध्ये सहभागी झाली होती. पण ती यावेळी पहिल्या 32 संघांत नोंदणी न करू शकल्यामुळे यंदाच्या सीझन 3 मध्ये सहभागी होऊ शकली नाहीत, अशी माहितीही पुर्वेश सरनाईकांनी दिली.
सर्वांना समान संधी देण्यासाठी काही नियम काटेकोरपणे पाळावे लागतात-
जय जवान पथकाने 5 जुलै 2025 रोजी एका कार्यक्रमात मानवी मनोरे सादर केल्यामुळे स्पर्धेतून वगळण्यात आले, असा दावा केला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली होती आणि 28 जून रोजी 16 संघांची पहिली यादीही जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे, हा आरोप पूर्णपणे खोटा व दिशाभूल करणारा आहे, असे पुर्वेश सरनाईक यांना स्पष्ट केले. राज्यभरातून अनेक लहान-मोठ्या गोविंदा पथकांना प्रो गोविंदा सीझन 3 मध्ये आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्ण संधी मिळत आहे. आम्ही कोणत्याही पथकाच्या भावना दुखावू इच्छित नाही, परंतु सर्वांना समान संधी देण्यासाठी काही नियम काटेकोरपणे पाळावे लागतात, असंही पुर्वेश सरनाईक म्हणाले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा