
Jai Jawan Govinda Pathak: मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात ‘कोकण नगरचा राजा’ या गोविंदा पथकाने दहा थर रचून विश्वविक्रम केला. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) करण्यात आली आहे. आज प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र ‘कोकण नगरचा राजा’ गोविंदा पथकाला (Kokan Nagar Govinda Pathak) प्रदान केले जाणार आहे. याबाबत प्रो गोविंदा स्पर्धेचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, दहीहंडी 2025 मध्ये कोकण नगरचा राजा या गोविंदा पथकाने सर्वप्रथम 10 थर रचले होते. तर कोकण नगरचा राजा गोविंदा पथकासोबतच जय जवान गोविंदा पथकाने (Jai Jawan Govinda Pathak) देखील 10 थर रचत विश्वविक्रम केला. कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने एकदा 10 थर लावले. तर जय जवान गोविंदा पथकाने तीनवेळा 10 थर रचले. जय जवान पथकाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली नसल्याचं जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले. संदीप ढवळे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत सदर प्रकणावर भाष्य केलं.
संदीप ढवळे काय म्हणाले?
काल (3 सप्टेंबर) रात्री उशीरा आम्हाला कोकण नगरचा राजा गोविंदा पथकला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र मिळतंय असं कळलं. आम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमुख यांना विचारले असता आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दहीहंडी होऊन एक महिना झाला. निकष काय होते समजले नाही. आम्हाला उत्तर दिलं जात नाहीय. या गोष्टी न पटणाऱ्या आहेत. आम्हाला न्याय मिळायला हवा, असं संदीप ढवळे म्हणाले.
आम्हाला कुठेतरी पाणी मुरताना दिसतंय- संदीप ढवळे
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी स्पर्धा ठेवा. त्यावेळी दहीहंडीचा सण होता. विविध ठिकाणी देखील जावं लागतं. आम्हाला तेव्हा सांगितलं असतं की सदर ठिकाणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी आहेत, तर आम्ही तिकडे गेलो असतो. आमच्यावर अन्याय होतोय, असं संदीप ढवळेंनी सांगितले. तसेच कोकण नगरचा राजा या पथकाला कोणत्या निकषाच्या आधारवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळतंय, हेच आम्ही बघतोय. पारदर्शकता ठेवा. आम्हाला कुठेतरी पाणी मुरताना दिसतंय, असा आरोप संदीप ढवळे यांनी केला. आम्ही दिवसभरात तीनवेळा 10 थर लावले, याकडे कोणी लक्ष दिले नाही, असंही संदीप ढवळेंनी सांगितले. आम्ही यंदा ज्या ज्या ठिकाणी 10 थर लावले, त्या ठिकाणाच्या आयोजकांना विनंती आहे. त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे निखिल शुक्ला यांच्याशी संवाद साधावा आणि जय जवानने 10 थर लावल्याची माहिती द्यावी. ठाकरे बंधूंच्या राजकारणाशी आणि याचा काहीही संबंध नाहीय. पण खच्चीकरण होतंय, अशी खंत संदीप ढवळे यांनी बोलावून दाखवली.
निर्णय पुरावे, गुणवत्ता आणि न्यायाच्या आधारे घ्यावा- जय जवान
दहीहंडी कार्यक्रमानंतर लगेचच आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या भारतीय प्रतिनिधीशी सतत संपर्कात होतो. आमच्या कामगिरीबाबत अधिकृत ई-मेल संवाद झाला आहे. आम्हाला गिनीजकडून अधिकृत प्रस्ताव (Official Proposal Document) ई-मेलद्वारे प्राप्त झाला आहे. म्हणजेच आमचा विक्रम हा फक्त स्थानिक घोषणेपुरता मर्यादित नाही, तर तो गिनीजच्या औपचारिक प्रक्रियेत आधीपासून नोंदवलेला आहे. गिनीजकडे पुनरावलोकन व अपील प्रक्रिया अधिकृतपणे उपलब्ध आहे आणि आम्ही ती वापरत आहोत. एका पथकाला घाईघाईने मान्यता देऊ नये, जेव्हा दुसरे पथकही त्याच दिवशी, त्याच स्तरावर पोहोचले आहे. निर्णय पुरावे, गुणवत्ता आणि न्यायाच्या आधारे घ्यावा. गिनीजचा सन्मान राखत, आमची मागणी फक्त एवढीच आहे की दोन्ही पथकांचा पुरावा समान न्यायाने तपासला जावा, असं जय जवानकडून सांगण्यात आले. दोन्ही पथकांनी हा विक्रम एकाच दिवशी – १६ ऑगस्ट २०२५ रोजी केला, परंतु वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी. म्हणूनच सर्व पथकांचे पुरावे समान पातळीवर तपासले गेले पाहिजेत. जर फक्त एका पथकाला मान्यता देऊन आमचा प्रयत्न दुर्लक्षिला गेला, तर इतिहास अपूर्ण राहील, असं जय जवानकडून सांगण्यात आले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा