नालेसफाईच्या कामांना नवी मुंबईत वेग  अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व शहर अभियंता श्री. संजय देसाई यांची संयुक्त पाहणी..
Oplus_0

नालेसफाईच्या कामांना नवी मुंबईत वेग अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व शहर अभियंता श्री. संजय देसाई यांची संयुक्त पाहणी..

          पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विशेष आढावा बैठक घेत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मागील आठवडयात दिले असून त्या अनुषंगाने सर्वच विभागांमार्फत सुरु असलेल्या कामांना वेग आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पूर्वेकडील डोंगररांगांपासून पश्चिमेकडील खाडीला मिळणारे नैसर्गिक नाले असून ते पावसाळी पाणी विनाअडथळा वाहून जाण्यासाठी साफ असावेत यादृष्टीने त्या नाल्यांसह शहराच्या अंतर्गत असलेल्या मोठया नाल्यांचीही पावसाळापूर्व सफाई सुरु आहे.

 

          नमुंमपा क्षेत्रात 77 लहान – मोठे नैसर्गिक नाले असून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत त्यांच्या सुरु असलेल्या सफाई कामांची अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार आणि शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी संयुक्तपणे पाहणी करत या कामांना वेग देण्याच्या व खोल सफाई करण्याच्या सूचना केल्या. याशिवाय सायन-पनवेल महामार्गावर तीन नाल्यांची अभियांत्रिकी विभागामार्फत सफाई करण्यात येत आहे.

 

          नाल्यांमधून जेसीबीव्दारे काढला जाणारा गाळ तसेच काही नाल्यांच्या प्रवाहात व काठांवर असणारी मनुष्यबळ लावून साफ केली जाणारी झाडे झुडपे आणि कचरा काठांवर ठेवला जात असून हा गाळ काहीसा सुकून वाहतूक करण्यायोग्य झाल्यानंतर तत्परतेने त्या ठिकाणाहून हलविण्याची खबरदारी घ्यावी असे निर्देश देत याबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे निर्देशित करण्यात आले.

 

          या पाहणीमध्ये वाशीतील से-17 नाला, से.12 नाला, से.29 नाला तसेच से.12 व से.8 येथील धारण तलाव त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथील आलोक नाला, से.2 नाला, घणसोली-कोपरखैरणे नाला या नाले स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. नाल्यांची साफसफाई, धारण तलावांचे फ्लॅप गेट्स, पंपिंग मशिनरी, स्ट्रेन्चेस अशा विविध कामांची त्यांनी बारकाईने पाहणी केली.

 

          आयुक्त महोदयांनी पावसाळापूर्व कामांसाठी 15 मे ही डेडलाईन दिली असून विहित वेळेत काम पूर्ण करण्याचे संबंधित विभागांनी नियोजन करावे व विशेषत्वाने नैसर्गिक नाले सफाईच्या कामांना वेग दयावा असे अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी निर्देशित केले आहे. या पाहणी प्रसंगी संबंधित विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

 

Oplus_0

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *