
Kabutar Khana Dadar मुंबई: दादरच्या कबुतरखान्यावरील (Dadar Kabutar Khana) ताडपत्री हटवण्यासाठी आज (6 ऑगस्ट) जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन समाजाकडून काढण्यात आली. अनेक महिलांनी कबुतरखान्यात घुसून ताडपत्री बांधलेली काढली. तसेच कबुतरखान्यावर बांधण्यात आलेले बांबू देखील महिलांकडून हटवण्यात आले. दरम्यान, कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घातली होती.
मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर कारवाई करण्यात येत आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार कबूतर खाणे मुंबई शहरात बंद करण्यात आलेले आहेत. मात्र याला काही लोकांकडून विरोध केला जातोय. मुंबईत कबूतरखाने सुरू राहावेत, यासाठी जैन समाज चांगलेच आक्रमक झाले होते. यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह जैन समाजाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. यानंतर दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं होतं.
कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यापूर्वीच जैन समुदायाचा जमाव आक्रमक-
आज दादर कबुतरखान्याच्या परिसरात जैन समाजाकडून प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आज सकाळीच काही जैन बांधवांनी आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करु, आम्ही कुठलीही जोरजबरदस्ती करुन ताडपत्री हटवणार नाही, असे म्हटले होते. मात्र, पालिकेने कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यापूर्वीच जैन समुदायाचा जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून काढून टाकली.
कबुतरखाना का बंद केला?, कारणे काय?
गेल्या अनेक महिन्यांपासून दादरमधील कबुतरखाना हटवण्याची मागणी होत आहे. हा कबुतरखाना दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे. हा कबुतरखाना दादरची ओळख बनला होता. मात्र, याठिकाणी येणाऱ्या कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्याचे समोर आले होते. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या होत्या. याशिवाय, हा कबुतरखाना रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हा कबुतरखाना हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती.
कबुतरखान्यावरुन उच्च न्यायालयाने काय म्हटलं?
कबुतरांच्या थव्याला खायला घालणे हा सार्वजनिक उपद्रव आहे. हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे आणि सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर आणि संभाव्य धोका असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. तसेच कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देशही न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले. शहरातील कबुतरखान्यांमध्ये कबुतरांचे जमाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आणि कठोर उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देशही न्यायालयाने बीएमसीला दिले.
कबुतरखाना ताडपत्रीने झाकून बंद केल्यानंतर जैन समाज नाराज-
मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखाना ताडपत्रीने झाकून बंद केल्यानंतर जैन समाज नाराज झाला होता. याविरोधात जैन समाजाने मोर्चाही काढला होता. तर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही दादर कबुतरखाना बंद होऊ नये, यासाठी कंबर कसली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, कालिदास कोळंबकर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कबुतरखाने बंद करु नयेत, असे आदेश महापालिकेला दिले होते.
दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही- देवेंद्र फडणवीस
दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेने कंट्रोल फिडिंग करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद केले. परंतु त्यावरून गुजराती जैन समूदाय मात्र आक्रमक झाल्याचं दिसून आला.
कबुतरांमुळे मानवांमध्ये धोकादायक होतात आजार-
कबुतर मानवांमध्ये काही विशिष्ट आजार पसरवू शकतात, जे त्यांच्या विष्ठेद्वारे (बीट), पिसे, शरीरातून बाहेर पडणाऱ्या धुळीच्या कणांद्वारे किंवा परजीवींद्वारे पसरतात. त्यांना झुनोटिक आजार म्हणतात, म्हणजेच प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारे आजार. यामध्ये क्रिप्टोकोकोसिस, हिस्टोप्लाज्मोसिस सायटाकोसिस किंवा पोपट ताप, साल्मोनेलोसिस, एव्हीयन माइट इन्फेस्टेशन आणि टॉक्सोप्लाज्मोसिस सारखे आजार समाविष्ट आहेत.
दादरच्या कबुतरखान्याजवळ नेमकं काय घडलं?, VIDEO:
आणखी वाचा