
Kabutar Khana Dadar मुंबई : दादरमधील कबुतरखान्याला वाचवण्यासाठी काही दादरकरांसह जैन समाज आज पुन्हा रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान आज (6 ऑगस्ट) सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. त्यांनतर कबुतरखान्यावरील (Dadar Kabutar Khana) ताडपत्री हटवण्यासाठी जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन समाजाकडून काढण्यात आली. यावेळी अनेक महिलांनी कबुतरखान्यात घुसून घोषणाबाजी करत ताडपत्री काढली. तसेच कबुतरखान्यावर बांधण्यात आलेले बांबू देखील महिलांकडून हटवण्यात आले.
दरम्यान, काही वेळ चालेल्या या आंदोलनानंतर अखेर जैन धर्मगुरुंनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केलं. परिणामी आंदोलकांना केलेल्या आवाहनांतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. पोलिसांनी उपस्थितीत जैन आंदोलक समोरच्या मंदिरात आणि इतरत्र पांगले गेले आहेत. या घटनेनंतर आता घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाला हि पाचारण करण्यात आले आहे. सोबतच याठिकाणी आता पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त देखील तैनात करण्यात आळा आहे.
कबुतरखाना हटवण्याची स्थानिक नागरिकांकडून मागणी, कारणे काय?
मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखाना ताडपत्रीने झाकून बंद केल्यानंतर जैन समाज नाराज झाला होता. याविरोधात जैन समाजाने मोर्चाही काढला होता. तर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही दादर कबुतरखाना बंद होऊ नये, यासाठी कंबर कसली होती. या पार्श्वभूमीवर आज या सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं. गेल्या अनेक महिन्यांपासून दादरमधील कबुतरखाना हटवण्याची मागणी होत आहे. हा कबुतरखाना दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे. हा कबुतरखाना दादरची ओळख बनला होता. मात्र, याठिकाणी येणाऱ्या कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्याचे समोर आले होते. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या होत्या. याशिवाय, हा कबुतरखाना रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हा कबुतरखाना हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती.
कबुतरांमुळे मानवांमध्ये धोकादायक होतात आजार
कबुतर मानवांमध्ये काही विशिष्ट आजार पसरवू शकतात, जे त्यांच्या विष्ठेद्वारे (बीट), पिसे, शरीरातून बाहेर पडणाऱ्या धुळीच्या कणांद्वारे किंवा परजीवींद्वारे पसरतात. त्यांना झुनोटिक आजार म्हणतात, म्हणजेच प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारे आजार. यामध्ये क्रिप्टोकोकोसिस, हिस्टोप्लाज्मोसिस सायटाकोसिस किंवा पोपट ताप, साल्मोनेलोसिस, एव्हीयन माइट इन्फेस्टेशन आणि टॉक्सोप्लाज्मोसिस सारखे आजार समाविष्ट आहेत.
आणखी वाचा