
Ketaki Chitale and Sandeep Deshpande: सध्या राज्यात मराठीच्या मुद्द्यावरुन राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले आहे. राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) जोरदार विरोध केला होता. यानंतर राज्य सरकारने हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतला होता. तेव्हापासून मुंबईसह राज्यात मराठीचा (Marathi Language) मुद्दा तापला आहे. अशातच या वादात वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने उडी घेतली होती. ‘मराठी न बोलल्याने अंगाला भोकं पडतात का’, असा प्रश्न तिने मराठीचा आग्रह धरणाऱ्या संघटनांना विचारला होता. त्यामुळे मनसे आक्रमक होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना केतकी चितळे हिच्या वक्तव्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर संदीप देशपांडे यांनी केवळ एका वाक्यात हा विषय संपवला. ‘मला फक्त चितळ्यांची भाकरवडी माहिती आहे’, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
Ketaki Chitale: केतकी चितळे मराठी भाषेबद्दल नेमकं काय म्हणाली?
“आपण अभिजात दर्जाबद्दल बोलूया. अभिजात हा संस्कृत शब्द आहे, जसं मी सांगितलं की अभिजात म्हणजे, स्वतंत्र असायला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे. हा जो काही क्रायटेरिया होता तो 2024 मध्ये काढण्यात आला. ज्यामुळे मराठी, बंगाली आणि आसामी या भाषांनासुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आला. पण वैयक्तिक सांगायचं झालं तर, मी याच्या विरोधात आहे. जर तुम्हाला करायचंच आहे, तर सगळ्याच भाषांना दर्जा द्या…”, असं केतकी चितळे म्हणते. “एकाने मला असंही सांगितलं, माझ्या जवळच्या व्यक्तीने; त्याने मला सांगितलं की, हिंदी आणि उर्दूलासुद्धा दर्जा नाहीये. त्यामुळे त्यांनीसुद्धा भांडायला पाहिजे.”
“माझं असं झालं की, ते का भांडतील? दर्जा पाहिजे, त्यामुळे फक्त इंसिक्योरिटी वाटते. दर्जा मिळाला, त्याने काय झालं? आम्हाला दर्जा पाहिजे-दर्जा पाहिजे, त्यामुळे इंसिक्योरिटी आणखी वाढते.” असं म्हणत तिने मराठी भाषिकांच्या मागणीलाच ‘असुरक्षिततेचं’ प्रतीक ठरवलं आहे. “मराठीत बोल-मराठीत बोल, मराठी येत नाही. अरे! तो बोलेल नाही बोलणार, त्याने काय मराठी भाषेचं नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? नाही ना! तुम्ही तुमची स्वतःची इंसिक्योरिटी दाखवताय. त्याने काय फरक पडतोय? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही.”, असं केतकी चितळे म्हणाली.
दरम्यान, राज्यात आधीच हिंदी मराठी भाषेचा वाद उफाळला आहे. मायबोली मराठी भाषेसाठी मराठी माणूस एकवटला असून भाषा टिकवण्यासाठी सगळे एकजुटीनं उभे ठाकले आहेत. अशातच स्वतः मराठी असूनही केतकीनं मराठीबाबत जी मोठी गरळ ओकली आहे, त्यामुळे मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आणि सन्मानासाठी लढणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे.
आणखी वाचा
हिंदुत्वाची लढाई, वोट जिहादचा मुद्दा; मतदानानंतर केतकी चितळेचा व्हिडीओ चर्चेत
आणखी वाचा