
Lalbaugcha Raja 2025: मुंबईतील मानाच्या आणि प्रतिष्ठित गणपती मंडळांपैकी एक असणाऱ्या लालबाग सार्वजनिक उत्सव समितीकडून बसवण्यात येणाऱ्या लालबागचा राजाचे शनिवारी विसर्जन होणार आहे. थोड्याचवेळात लालबागचा राजा विसर्जन (Lalbaugcha Raja Visarjan 2025) मिरवणुकीसाठी मंडपातून निघणार आहे. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने या गणपतीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. दरवर्षी लालबागचा राजाचा नवस फेडण्यासाठी नवसाची भलीमोठी रांग लागते. लालबागचा राजाच्या पायांपाशी जाऊन दर्शन घेण्यासाठी अनेक तास वाट पाहावी लागते. त्यामुळे अनेक भाविक लालबागचा राजाचे मुखदर्शन घेऊन धन्यता मानतात. मात्र, लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठीही मोठी रांग असते. आज अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) दिवशी लालबागचा राजाचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद करण्यात आली. यानंतर भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते.
लालबागचा राजाची मुखदर्शनाची रांग बंद होताना काही भाग्यवंतांना राजाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत लालबागचा राजाच्या मुखदर्शनाच्या रांगेतील शेवटचा भक्त दिसत आहे. या शेवटच्या भक्ताचा लालबागचा राजा मंडळाकडून सत्कार करण्यात आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मिडीयावर अनेकजण या व्यक्तीला ‘भाग्यवंत’ म्हणत आहेत.
लालबागचा राजा आता थोड्याचवेळात आपल्या मंडपातून गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होईल. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक अनेक तास चालते. आज लालबागचा राजा मंडपातून निघत असला तरी तो उद्या सकाळी गिरगाव चौपाटीवर दाखल होईल. आता लालबागचा राजा हा लालबाग उड्डाणपूल, भायखळा स्टेशन,हिंदुस्थान मशीद, भायखळा अग्निशमन दल, नागपाडा चौक, गोल देऊळ, दो टाकी, ऑपेरा हाऊस ब्रिज ते गिरगाव चौपाटी असा प्रवास करेल. लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीलाही प्रचंड गर्दी असते. लालबागचा राजाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी अनेकजण गिरगाव चौपाटीवर गर्दी करतात. याठिकाणी भाविक लालबागचा राजाला साश्रू नयनांनी निरोप देतात. लालबागचा राजाला विशेष तराफ्यावर बसवून खोल समुद्रात नेले जाते आणि त्याठिकाणी या गणपतीचे विसर्जन केले जाते.
आणखी वाचा
आणखी वाचा