
मुंबई : लालबागचा राजाचं विसर्जन समुद्राला भरती येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाची मिरवणूक सुरु होऊन तीस तास उलटून गेल्यानंतर देखील विसर्जन होऊ शकलेलं नाही. लालबागचा राजा मंडळाकडून अत्याधुनिक तराफा या वर्षी विसर्जनासाठी तयार करण्यात आला आहे. त्या तराफ्यावर लालबागचा राजा रथावरुन घेण्यात आज दुपारी साडे चार वाजता यश आलं. आज रात्री साडे दहा नंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होईल, अशी माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी यांनी फोन करुन विचारपूस केली आहे.
उद्धव ठाकरेंचा सुधीर साळवींना फोन
उद्धव ठाकरे यांनी लालबागचा राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना फोन करून विचारपूस केली आहे. आज दिवसभरात लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात आलेल्या अडचणी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळीव यांच्यासोबत चर्चा केली.
तसेच सर्व कार्यकर्त्यांनी काळजी घेण्याचंही आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मंडळाचे पदाधिकारी काय म्हणाले?
लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी रात्री 10 ते 11 वाजता भरतीची वेळ आहे. आमचे कोळी बांधव आमच्यासोबत आहेत. आरती झाल्यानंतर रात्री साडे दहा नंतर स्वयंचलित तरफा खोल समुद्रात जाईल आणि विसर्जन होईल. विसर्जनापूर्वीची आरतीची परंपरा आहे, त्यानुसार लालबागच्या राजा समुद्रकिनारी येत असतो, त्यावेळी मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते आरती होईल, त्यानंतर बाप्पा मार्गस्थ होतील, असं बाबासाहेब कांबळे म्हणाले.
सुधीर साळवी काय म्हणाले?
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा अत्याधुनिक तराफा तयार करण्यात आला आहे. लालबागचा राजाच्या विसर्जन सोहळा भरती आणि ओहोटीवर अवलंबून असतो. आम्ही इथं येण्यापूर्वी भरती आली होती. आम्ही एक प्रयत्न करुन बघितला होता. मात्र, लालबागचा राजा करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असल्यानं आम्ही तो प्रयत्न थांबवला. ओहोटीच्या वेळी लालबागचा राजा तराफ्यावर घेतला जातो. त्यानंतर भरतीच्या वेळी तराफ्यावरुन विसर्जन केलं जातं, असं सुधीर साळवी म्हणाले. उशिरा झालेल्या विसर्जनामुळे मी मंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. लालबागचा राजा लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. पोलीस, महापालिका, माध्यमांचे आभार मानतो, असं सुधीर साळवींनी म्हटलं. कोळी बांधवांसोबत केलेल्या चर्चेनुसार रात्री साडे दहानंतर विसर्जन होईल, असं सुधीर साळवी यांनी सांगितलं. कोळी बांधव गेल्या 24 वर्षांपासून विसर्जनात सहभागी होतात, असंही साळवी म्हणाले.
आणखी वाचा