
Maharashtra government officers Honey Trap Case: राज्यातील तब्बल 72 क्लास वन अधिकारी आणि काही माजी मंत्र्यांनी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून त्यांचे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली होती. राज्य सरकारने हे वृत्त फेटाळून लावले असले तरी याबाबत ठोस भूमिकाही घेतली नव्हती. त्यामुळे महायुती सरकारच्या भूमिकेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. अंबादास दानवे यांनी गुरुवारी विधान परिषदेत याबाबत भाष्य केले.
राज्यातील 72 अधिकारी आणि काही माजी मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती आहे. या हनीट्रॅपच्या माध्यमातून सरकारी फाईल्स आणि गोपनीय सरकारी गोष्टी बाहेर गेल्या आहेत, अशी माहिती आहे. ठाणे आणि नाशिकमध्ये पोलिसांकडून याबाबत चौकशी झाली आहे. शासकीय गुप्ततेचा भाग व ब्लॅकमेलिं मधून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. या हनीट्रॅपमध्ये अडकलेल्यांमध्ये काही राजकीय लोकांचेही नाव घेतले जात आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करुन काही प्रशासकीय लाभ घेतल्याची शक्यता आहे. राज्याच्यादृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. राज्य सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
Honey Trap News: महाराष्ट्रातील हनीट्रॅप प्रकरण नेमकं काय?
नाशिक दौऱ्यावर असलेल्या एका राजकीय नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान राज्यातील 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि काही माजी मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा गौप्यस्फोट केला होता. नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्याचे सांगितले जाते. नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात याबाबत एका महिलेने तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानुसार राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी आणि अधिकारी हनी ट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात अडकल्याची माहिती आहे. या अधिकारी आणि माजी मंत्र्यांची नावे सरकारकडून गोपनीय ठेवण्यात आली आहेत. हा तपासही गोपनीय पद्धतीने सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाणे गुन्हे शाखेकडे एकूण तीन तक्रारी आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या तीनही तक्रारींची गोपनीय चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे. नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबईतील एक व्यक्ती आणि ठाण्यातील एका बड्या व्यक्तीने या तक्रारी केल्याचे समजते. या तिन्ही तक्रारींमध्ये गंभीर स्वरुपांचे आरोप असून उच्चस्तरीय गोपनीय चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करताना ओळख सार्वजनिक करु नये, असे तक्रारदारांचे मत असल्याने अधिकाऱ्यांची नावे गोपनीय ठेवून अशा प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे गुन्हे शाखेकडे तीन तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
जे प्रशासकीय अधिकारी हे हनीट्रॅपमध्ये अडकले जातात त्यांच्या तक्रारी आमच्याकडे येतात. या प्रकरणाचा तपास करताना आमची ओळख ही सार्वजनिक करू नका असे तक्रारदारांनी सांगितले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची नावं गोपनीय ठेवून अशा प्रकरणांचा तपास केला जातो, असे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले.
आणखी वाचा
राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी, माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात? महिलेचा व्हिडीओबाबत खळबळजनक दावा
आणखी वाचा