
Maharashtra Rain Weather Alert : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याचे चित्र आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने एकाच दाणादाण उडवली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचा प्रभाव म्हणून सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला असल्याचं हवामान खात्याच म्हणणं आहे.
दरम्यान, मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी कोसळणाऱ्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याच पाहायला मिळत आहे. यामुळे थोड्याफार प्रमाणात रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या सेंट्रल रेल्वे पाच ते दहा मिनिट उशिराने, हार्बर पाच मिनिटे उशिराने तर वेस्टर्न रेल्वे सुरळीत सुरू आहे. पावसाचा जोर आणखी वाढला तर रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम होऊ शकतो.
मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबईत काल (17 ऑगस्ट) मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस आणि आजही मुंबईत जोरदार पाऊस पडतोय. यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्याना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्गावर, विलेपार्ला अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव दरम्यान ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गोरेगाव ते विलेपार्ले पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रवास आहे. मात्र या वाहतूक कोंडीमुळे (सकाळी 9 वाजताच्या सुमारास) एक ते दीड तासांमध्ये वाहन चालकांना वाट काढावी लागत आहे. सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गाची वाहतूक कोंडी काढण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी भरायला सुरुवात
पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेचा सखल भाग असल्यामुळे सबवेमध्ये 1 फूट पाणी भरलं आहे. सध्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. जर असाच जोरदार पाऊस काही वेळ चालू राहिला तर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.
वाशिम जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाचा कहर
वाशिम जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात पावसाचा नैसर्गिक कहर पहावयास मिळतोय. जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक गाव प्रभावित झाले असून नदी नाल्यांना पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात 261 गावांना अतिवृष्टीचा फटका बसलाय. तर 78, 804 शेतकऱ्याचं 80 हजार हेक्टरवर शेतीच नुकसान झालंय. तर 43 जनावरांसह 1 मानवाची जीवित हानी झालीय. तसेच 238 हेक्टरवरील पीक अक्षरशः खरडून गेली असून 240 शेतकरी बाधित झाले आहे. तर 240 नागरिकांच्या घराचं किरकोळ नुकसान झालाय. या अतिवृष्टीमूळे खरीप पिकाची मोठी नासाडी झालीय. ज्यामध्ये सोयाबीन, तूर, हळद, फळबाग, मसाला पिकांना मोठा फटका बसलाय. झालेलं नुकसान शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक विवंचनेत नेणार आहे.
दरम्यान, आताची ही आकडेवारी प्रशासनाने काल जरी जारी केली असली तरी मात्र, येत्या दोन दिवस मोठ्या पावसाची शक्यता व्यक्त केल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आता प्रशासन नेमके नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे कसे करते आणि नेमका किती नुकसान भरपाई देतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
लातूर जिल्ह्यात पावसाचा मोठा परिणाम, पाच मार्गावरील वाहतूक ठप्प
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका आणि अहमदपूर तालुक्यातील वाहतुकीवर पावसाचा मोठा परिणाम झालाय. पुलावरून पाणी गेल्याने पाच ठिकाणी वाहतूक ठप्प झालीय. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळावा आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी नदी नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. अरुंद आणि कमी उंचीच्या पुलावरून पाणी जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
– उदगीर- देगलूर मार्गावरील करजखेल येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उदगीर-देगलूर मार्गावरील वाहतूक बंद आहे.
– उदगीर ते हानेगावमार्गे हंगरगामधील गळसुबाई तांडा येथील पुलावर पाणी असल्यामुळे उदगीर-हानेगाव मार्गे हंगरगा वाहतूक बंद झाली आहे.
– उदगीर- होकर्णा या मार्गावरील भवानी दापका येथील पूलावर पाणी असल्यामुळे उदगीर- होकर्णा, उदगीर- हानेगाव मार्गे बोंथी वाहतूक बंद झाली आहे.
– माणकेश्वर – उदगीर या मार्गावरील इंद्रराळ येथील पुलावरून पाणी वाहत आहे. सदरचा मार्ग बंद आहे.
– अहमदपूर-अंधोरी मार्ग पावसामुळे बंद आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा