
Maharashtra Weather Update : राज्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुनः आगमन केल्याने बळीराजाची चिंता काहीशी मिटली आहे. एकीकडे शेतीच्या कामांची लगबग सुरु असून अनेकांनी शेतातील पेरणी हि आटोपली आहे. मात्र ऐनवेळी पावसाने पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट हि डोकावू लागले आहे. अशातच राज्यात पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तर सध्या पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने दक्षिण कोकणासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तर मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाल्याने आणि अनुकूल वातावरणीय स्थितीमुळे पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाजहि हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
राज्यात पावसाच्या जोर वाढणार, या जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’
दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार मंगळवार ते शुक्रवार या कालावधीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे. या तुलनेत उत्तर कोकणात पावसाचा जोर कमी असेल. तर बुधवार, गुरुवारी तुरळक ठिकाणी मुंबई, ठाणे येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यासह ठाणे जिल्ह्याला गुरुवारी ‘ऑरेंज ॲलर्ट’ आहे. पालघरमध्ये बुधवारी, गुरुवारी मुसळधार पाऊस पडू शकतो. कोल्हापूर, सातारा घाट परिसराला मंगळवारपासून, तर पुणे घाट परिसराला बुधवारपासून ‘ऑरेंज ॲलर्ट’ आहे.
परभणीत पहाटेपासून पावसाची रिपरिप; पिकांना जीवदान
परभणी जिल्ह्यात यंदा पावसाने प्रत्येक वेळी हुलकावणी दिली आहे. मात्र आता मागच्या पाच दिवसानंतर परभणीत पावसाने हजेरी लावलीय. मध्यरात्री अर्धा तास जोरदार पाऊस बरसल्यानंतर पहाटेपासून परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाड्याने त्रस्त असलेल्या परभणीकरांना दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे पावसाचा खंड मिळाल्याने सुकुन जाणाऱ्या पिकांना ही जीवदान मिळाल आहे. दरम्यान अजूनही परभणी जिल्ह्याला मोठ्या पावसाची अपेक्षा असून पिकांबरोबरच प्रकल्पांमधील पाण्यासाठ्यात वाढ होणे गरजेचे आहे.
बुलढाणाच्या लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस; पांग्रा डोळे गावात पुन्हा शिरले पाणी
बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात मध्यारात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील पांग्रा डोळे, टिटवी, नांद्रा , सह परिसरात ही मुसळधार पाऊस झाला. मात्र यावेळी पुन्हा एकदा पांग्रा डोळे परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील वाहणारे पाणी थेट पांग्रा डोळे गावात पुन्हा शिरले असून गावातील काही घरात पाणी शिरल्याने घरांतील साहित्याचे मत नुकसान झाले आहे. असेच शेतातील पाणी दरवर्षी गावात शिरते आणि गावातील घरांचे नुकसान होतय.. ग्रामस्थानी प्रशासनाकडे अनेक वेळा यासंदर्भात तक्रार दिली , मात्र प्रशासन याला गांभीर्याने घेत नसल्याने दरवर्षी पाणी गावात शिरते आणि घराचे नुकसान होते .. त्यामुळे उपाययोजना म्हणून गावाबाहेरून नाली खोदण्यात यावी, आणि शेतातील पाणी बाजूला असलेल्या नदीत सोडून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय .. भविष्यात जर का काही मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थानी उपस्थित केलाय.
माजलगावच्या कोथाळा गावच्या सरस्वती नदीला पूर
बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे. कोथाळा गावातील सरस्वती नदीला पूर आला असून पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यरात्री पुन्हा पाऊस झाल्याने सरस्वती नदी तुडुंब भरून वाहतेय. नदीला पूर आल्याने कोथाळा आणि सिरसाळा गावचा संपर्क तुटला आहे. दरम्यान चांगला पाऊस झाल्याने परिसरातील खरीप हंगामाला मोठा फायदा झाला असून शेतकरी सुखावला आहे.
हे ही वाचा
आणखी वाचा