
मुंबई : विरोधी पक्षाच्या नेत्यावर खोट्या विनयभंगाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) फलटण प्रकरणात एसआयटी का स्थापन करत नाहीत असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी केला. मयत महिला डॉक्टरविरोधात एकाच महिन्यात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती, त्यांच्यावर कुणाचा दबाव होता असा प्रश्नही मेहबूब शेख यांनी केला. अजित पवारांनी महिला अधिकारी आयपीएस अंजना कृष्णा (Anjana Krishna IPS) यांना दम दिला होता, तरीही त्या मागे हटल्या नाहीत, त्यांना या तपासाच्या प्रमुख बनवा अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली. मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
फटलणमधील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचं प्रकरण गाजतंय. त्यामध्ये भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या संबंधित लोकांवर, पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले जात आहेत. याच प्रकरणात मेहबूब शेख यांनी पुन्हा आरोप केले.
Mahebub Shaikh On Phaltan Case :अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा
मेहबूब शेख म्हणाले की, “आधी ती महिला डॉक्टर चांगली होती, पण तीने डीवायएसपी राहुल धस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ती कशी काय वाईट झाली? 19 जून रोजी त्या डॉक्टरने राहुल धस यांच्याकडे तिच्यावर दबाव असल्याची तक्रार केली. त्यानंतर एकाच महिन्यात तिच्या विरोधात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केली. एकाच महिन्यात ती डॉक्टर कशी काय वाईट झाली? त्या तीन अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव होता? या प्रकरणाचा सविस्तर तपास व्हावा, त्या तीनही अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे.”
Mahebub Shaikh On Phaltan SIT : एसआयटी स्थापन का करत नाही?
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एसआयटी तपास करावा अशी मागणी डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केला. ती मागणी मान्य केली जात नाही असं मेहबूब शेख म्हणाले.
मेहबूब शेख म्हणाले की, “बीडमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यावर एक विनयभंगाची खोटी तक्रार करण्यात आली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमली आणि जवळपास 350 महिलांचा जबाब घेतला. एका खोट्या प्रकरणात हे सगळं काही केलं. मग फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. त्यासाठी जबाबदार लोकांची नावे सगळ्यांनाच माहिती आहेत. मग या प्रकरणात देवेंद्र फडणवीस एसआयटी का स्थापन करत नाहीत?”
अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना दम दिला होता, तरीही त्या मागे हटल्या नव्हत्या. त्यांना फलटण प्रकरणी तपास प्रमुख बनवा अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली.
Phaltan Doctor Suicide : मेहबूब शेख, अंधारेंचे निंबाळकरांवर आरोप
फलटण प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी संबंधित लोक सामील असल्याचा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी केला. या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर विश्वास नसल्याचंही ते म्हणाले.
या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण ज्या सहा नावांचा यामध्ये सातत्याने उल्लेख केला जात आहे त्यांच्यावर मात्र आरोपपत्र दाखल केलं जात नसल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.
डीवायएसपी राहुल धस, एपीआय जायपात्रे, माजी खासदारांचे दोन पीए शिंदे आणि नागटिळक, पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि मेडिकल अधिकारी अंशुमन धुमाळ यांच्यावर आरोपपत्र का दाखल केलं नाही असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला. या लोकांना डिपार्टमेंट वाचवत आहे का असंही सुषमा अंधारे यांनी विचारलं.
मुळात ज्या पोलिसांवर आरोप आहे किंवा संशय आहे त्यांची नावंच आरोपपत्रात नसेल तर मुलीच्या कुटुंबाच्या जबाबाला काहीच अर्थ नाही असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. त्यामुळे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा