
मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांच्या वादग्रस्त वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये,शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संताप आहे. त्यातच, राज्याचं सर्वोच्च सभागृह असलेल्या विधिमंडळात ते चक्क जंगली रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर आणल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी जोर धरत आहे. मात्र, मी राजानामा देण्यासारखं काहीच केलं नाही, मी सभागृहात रम्मी खेळत नव्हतो, मोबाईलमध्ये जाहिरात आली ती स्कीप करत होतो, असे स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिलं. त्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी माणिकराव कोकाटे यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली. तसेच, त्यांचा राजीनामा घेणार का, या प्रश्नावरही स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी पत्रकारांनी बोलताना चं रोखठोक भाष्य केले. माणिकराव कोकाटेंचा वि़डिओ सभागृहाच्या आत घडलं असल्याने तो विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींच्या अखत्यारित येतो. माझी आणि माणिकरावांची प्रत्यक्षात बैठक झाली नाही, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे. माझी आणि त्यांची बहुतेक सोमवारी बैठक होईल. मला कृषिमंत्री यांच्याशी समोरासमोर बोलायचं आहे. सोमवारी माझी व त्यांची भेट होईल, तेव्हा ते बोलतील. सरकारला ते भिकारी म्हणाले, याबाबत देखील मी त्यांच्याशी बोलणार आहे. तर, त्यांच्या कृषिमंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही एकत्रित निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी म्हटले.
इजा झालं, बिजा झाला, आता…
राजकीय जीवनात आणि प्रमुख पदावर काम करत असताना प्रत्येकाने भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, हेच माझं सांगणं आहे. मागे एकदा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून असंच घडलं होतं, तेव्हाही मी त्यांना समज दिली होती. इजा झालं, बिजा झालं आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका असं मी माणिकराव कोकाटेंना सांगितलं आहे. माझी त्यांची आता जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा मी काय कारवाई करायची ते बघेन, असे स्पष्ट शब्दात अजित पवारांनी सांगितले.
एखाद्याचा जीव गेलाय, चौकशी होईल
आमची आज सकाळी एक बैठक झाली आहे. एका कंत्राटदाराने सब कंत्राटदाराला नेमले, त्याने त्याला पैसे दिले नाहीत. मी कंत्राटदाराची माहिती घेत आहे. तरीपण एखाद्या व्यक्तीचा जीव गेला आहे. त्यामुळे सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे म्हणत अजित पवारांनी सांगलीतील युवक कंत्राटदाराने आत्महत्या केल्याच्या घटनेवर चौकशीची माहिती दिली. तसेच, कुणाची बिले दिले नाहीत, त्याची यादी मला द्या. बिले देण्याची काही प्रक्रिया आहे, असेही त्यांनी म्हटले.
भेटायला येणाऱ्यांचे स्वागत
छावा संघटनेचे विजय घाडगे मला भेटायला येत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. मला कुणीही भेटायला येऊ शकतं, असे म्हणत त्यांचे स्वागतच अजित पवारांनी केले आहे.
राजकीय हस्तक्षेप न करण्याच्या पोलिसांना सूचना
दौंडमधील कला केंद्रात जो गोळीबार झाला, तो हवेत गोळीबार झाला. ते पाहून महिला बेशुद्ध पडली. या घटनेत कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका अशा सूचना मी दिल्या आहेत. याप्रकरणात आमदार शंकर मांडेकर यांचा चुलत भाऊ आरोपी आहे, अशी माहिती अजित पवारांनी
महादेव मुंडे प्रकरणात कारवाई सुरू
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील पोस्टमार्टम रिपोर्ट आत्ता आला आहे, आम्ही कारवाई करत आहोत. कोर्टासमोर जे मांडायचं आहे ते मांडू, असे अजित पवारांनी बीडमधील हत्याप्रकरणावर बोलताना सांगितले.
एकदाच सगळं समोर आणा, केवळ दम देऊ नका
विरोधकांकडून पेन ड्राईव्ह दाखवून किंवा आमच्याकडे पुरावे आहेत असं म्हणत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जातं. त्यासंदर्भातील प्रश्नावरही अजित पवारांनी आपली भूमिका मांडली. एकदाच सांगतो, दम द्यायचं बंद करा. एकदाच काय तो पेन-ड्राईव्ह, तुमच्याकडे असणारे व्हिडिओ बाहेर काढा. एकदाच काय ते लोकांसमोर येऊ द्या, असे चॅलेंजच अजित पवारांनी विरोधकांना दिले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पेन ड्राईव्ह दाखवला होता, तर आमदार रोहित पवार, संजय राऊत यांनी आणखी व्हिडिओ असल्याचं म्हटलं होतं.
हेही वाचा
आणखी वाचा