
Maharashtra Agriculture minister Manikrao Kokate: शेतकऱ्यांविषयी असंवेदनशीलपणे वादग्रस्त वक्तव्यं केल्यामुळे आणि अधिवेशनकाळात सभागृहात ऑनलाईन रमी (Online Rummy) खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सध्या टीकेचे धनी ठरत असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदावरुन गच्छंती अटळ मानली जात आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात शुक्रवारी रात्री याबाबत दीर्घ चर्चा झाली असून येत्या काही तासांमध्ये माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याबाबतचा अंतिम निर्णय येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. अजूनही याबाबत अजित पवार गटात चर्चा सुरु आहे. माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्रिपदावरुन दूर करुन मंत्रिमंडळाच्या बाहेर बसवायचे की त्यांना एखादे दुसरे खाते द्यायचे, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अजित पवार यांनी ‘मंगळवारपर्यंत वाट पाहा’, असे सांगितले आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्यास त्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो, याबाबत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात चर्चा सुरु आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता माणिकराव कोकाटे यांनाही मंत्रिमंडळातून काढले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेला त्याचा धक्का बसू शकतो. अशाप्रकारे दोन ज्येष्ठ नेत्यांवर राजीनामा देण्याची नामुष्की ओढावणे, ही पक्षासाठी भूषणावह बाब नाही. माणिकराव कोकाटे याचा राजीनामा घेतला तर रोहित पवार आणि अन्य विरोधकांच्या दबावाला आपण बळी पडलो, असा संदेश जाऊ शकतो, असा मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातूनच बाहेर काढायचे की एखादे दुसरे खाते देऊन त्यांचे पुनर्वसन करायचे, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
Manikrao Kokate resignation: कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना मंगळवारी निरोपाचा नारळ मिळणार?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी पुण्यात रात्री दोन तास जिजाई येथील निवासस्थानी चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली चर्चा अजित पवार यांना कळवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माणिकराव कोकाटे यांचं सभागृहातील कृत्य आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत सरकारला भिकारी म्हणाले, या दोन गोष्टींवर प्रचंड नाराज असल्याची माहिती आहे. कोकाट हे सातत्याने सरकारला अडचणीत आणत असल्याने आता राजीनामा घेण्याशिवाय पर्याय नसल्याची बैठकीत चर्चा झाली. आज संध्याकाळपर्यंत अजित पवार पक्षातील आपल्या नेत्यांजवळ कोकाटे यांच्याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘एबीपी माझा’ला दिली आहे.
आणखी वाचा
कृषीमंत्री कोकाटे विधिमंडळात रमी खेळताना दिसले; प्रताप सरनाईक म्हणाले, आमिर-शाहरुख खानही खेळतात!
आणखी वाचा