
मुंबई : दादरच्या कबुतरखान्यावरुन आता वाद चांगलाच वाढताना दिसत आहे. धर्माच्या विरोधात गेलात तर आंदोलन करु असा इशारा देत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी थेट सरकारलाच आव्हान दिलं. तसेच भाजपच्या आमदार चित्रा वाघ आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांचा त्यांनी एकेरी उल्लेखही केला. त्यावर आता मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं ज्यांना कबुतरं आवडतात त्यांनी ते घरी पाळावेत, सार्वजनिक ठिकाणी त्याचा त्रास नको असं मनिषा कायंदे म्हणाल्या. या देशात पोलीस, न्यायव्यवस्था आहे की नाही असा सवाल त्यांनी केला.
अॅड. मनिषा कायंदे म्हणाल्या की, “खरंतर चार दिवसाआधी मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं होतं की या प्रकरणात जैन गुरु नव्हते. पण आता तेच धर्मगुरू या प्रकरणी आंदोलन करणार असल्याचं म्हणतात. दादरमधील कबुतरखाना हा माझा वैयक्तिक प्रश्न नाही, तर मुंबईत दोन कोटी लोक राहतात, त्यांचा हा विषय आहे.“
धर्मगुरु एकेरी उल्लेख करतात
मनिषा कायंदे म्हणाल्या की, “धर्मगुरू मार्गदर्शक असतात, ते आमचा एकेरी उल्लेख करतात. आम्ही विधान परिषदेवर आहोत, आम्ही कायदे मंडळामध्ये आहोत. आमच्यावर असं बोलणं बरोबर नाही. ज्यांना कबुतरं आवडतात त्यांनी घरी पाळावे. सार्वजनिक ठिकाणी याचा त्रास नको.“
न्यायव्यवस्था आहे का नाही?
कबुतरखान्यावर येताना चाकू-सुरे, हत्यारे काढता. या देशांमध्ये पोलीस आणि न्यायव्यवस्था आहे का नाही? असा प्रश्न मनिषा कायंदे यांनी केला. आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे. नागपंचमीला नागांना दूध पाजण्याची परंपरा होती, ती बंद केली. आता मशिदीवरचे अनधिकृत भोंगे बंद केले जात आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई व्हायला हवी असं मनिषा कायंदे म्हणाल्या.
जैन मुनींकडून आव्हानाची भाषा
दादरमधील कबुतरखाना बंद करण्यास जैन समाजाचा तीव्र विरोध आहे. अशातच जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी थेट सरकारलाच आव्हान देण्याची भाषा सुरू केली. कबुतरखान्याला विरोध करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना देखील जैन मुनींनी काही प्रश्न विचारलेत. तसंच कबुतर खान्यासंदर्भात सरकारनं अपेक्षित भूमिका घेतली नाही तर कबुतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा जैन मुनींनी दिला.
काय म्हणाले जैन मुनी?
जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले की, “प्रकरण कोर्टात चालू आहे, कबूतर मरता कामा नयेत. सरकारच्या आदेशानंतर पक्षांना खाद्य टाकणं सुरू झाल आहे. आमचं पर्युषण पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. या विषयावर 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ, शांतपूर्ण बसून उपोषण करू. आम्ही शस्त्र उचलणार नाही, पण गरज पडली तर आम्हीशस्त्र पण उचलू.“
धर्माच्या विरुद्ध काही होत असेल तर आम्ही कोर्टाला मानणार नाही. पालिकेने, कोर्टाने आणि प्रशासनाने आम्हाला नाकारलं तर आम्ही आंदोलन करु. त्यासाठी देशातील जैन धर्मिय येथे येतील. जैन धर्माला लक्ष्य का केल जातंय? मुंगीपासून ते हत्तीपर्यंत कोणताही जीव मरता कामा नये हे आमच्या धर्मात लिहिलं आहे असं जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सांगितलं.
चित्रा वाघ यांच्यावर टीका
हा सगळा विषय चित्रा वाघ आणि मनीषा कायंदेने काढला ना? चित्रा वाघ या कबुतरांमुळे माझी मामी मेली, मावशी मेली, असं सांगतात. पहिले त्या चित्रा वाघला विचारा की, दारु आणि कोंबड्या खाऊन किती लोक मेलेत? आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा मान ठेवायचा आहे. पण संविधानात लिहलं आहे, 223 कलमात कोणत्या पक्ष्याला मारणं अपराध आहे. आम्ही दादर कबुतरखान्याच्या परिसरात कबुतरांना खाणं टाकू नका, असा कोणताही बॅनर लावलेला नाही,असे जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी स्पष्ट केले.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा