Kalyan Crime News: कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सासऱ्याने जावयावर अॅसिड हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हनिमुनला जाण्यावरुन सासरा आणि जावई यांच्यात वाद झाल्याने त्या वादातून हा हल्ला केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस सासऱ्याचा शोध घेत आहेत.
ईबाद फालके असं जावयाचं नाव असून जकी खोटाल असे हल्लेखोर सासऱ्याचे नाव आहे. आरोपी सासऱ्याचा शोध पोलिस घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जावई आणि मुलीने प्राथनेसाठी मक्का मदिनेला जावे, अशी सासरा जकी खोटालची मागणी होती. मात्र, जावयाने आम्ही काश्मीरला जाणार असल्याचे सासऱ्यांना सांगितले. यावरुन त्यांचा काही दिवसांपासून वाद सुरू होता.
जावई आणि मुलगी हनिमुनला कुठे जाणार दोघांमध्ये वाद असतानाच सासऱ्याने पीडितेवर अॅसिड हल्ला केला. हनिमूनला कुठे जायचे? यावरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात आहे आहे. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची अफवा
मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी गणेश सर्जेराव मोरे हे कर्तव्यावर होते. त्यावेळी पोलीस ठाण्याचा फोन खणखणला. मोरे यांनी फोन उचलल्यावर समोरच्या व्यक्तीने मी दिल्लीवरून बोलतोय, असे म्हणत एका व्यक्तीचा नंबर सांगितला. या व्यक्तीने कल्याण रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला असल्याचे त्यांने सांगितले. तसेच कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देणार असल्याचेही सांगितले. त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलिसांनी ही माहिती ठाणे कंट्रोल रूम आणि कल्याण रेल्वे पोलिसांना दिली. कल्याण रेल्वे पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वाडच्या माध्यमातून पूर्ण रेल्वे स्थानक पिंजून काढले. तब्बल तीन ते चार तास झालेल्या सर्च ऑपरेशन नंतर बॉम्बची अफवा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
फ्लिपकार्ट हबमधून लाखोंचा माल चोरी
कल्याण कोळसेवाडी परिसरातील फ्लिपकार्ट हबमधून मोबाईल, लॅपटॉप आणि लखोचे इतर महागड्या वस्तूंची चोरी करणाऱ्या टोळीला कल्याण गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.प्रणव पांचाळ, प्रशांत शेलार, अमित राणे आणि अजित राणे अशी या आरोपीचे नाव असून त्यांच्याकडून ६.३३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोळशेवाडी पोलीस ठाण्यात सुरू आहे.