
Mumbai Crime: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. परळमधील (Parel) नित्यानंद कॉलनीतील प्रकाश कॉटन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी सायंकाळी एका डिलिव्हरी बॉयकडे पाहून माथेफिरूने एअर रायफलने हवेत गोळीबार (Firing) केल्याची घटना घडली. सतत बेल वाजवून त्रास देत असल्याच्या रागातून सौरभकुमार अविनाशकुमार सिंग या व्यक्तीने ही धक्कादायक कृती केल्याचे पोलीस (Police) तपासातून उघड झाले आहे. (Mumbai Crime)
ही घटना परळ पूर्व येथील ना. म. जोशी मार्गावरील प्रकाश कॉटन बिल्डिंग, 8 माळा नित्यानंद कॉलनी येथे घडली. सौरभने एका ऑनलाईन मेडिकल अॅपवरून शुक्रवारी सायंकाळी औषध मागवले होते. सौरभने दिलेल्या ऑर्डरनुसार डिलिव्हरी बॉय त्याची ऑर्डर घेऊन बिल्डिंगमध्ये पोहोचला.
माथेफिरुने हवेत केला गोळीबार
सौरभने दरवाजा उघडला नाही म्हणून डिलिव्हरी बॉयने दोन ते तीन वेळा घराची बेल वाजवली. याचा राग आल्याने सौरभने संतापून दरवाजा उघडला आणि डिलिव्हरी बॉयकडे पाहून एअर रायफलने हवेत गोळीबार केला. गोळीबाराची माहिती मिळताच मुख्य नियंत्रण कक्षाने तत्काळ ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सौरभकडून चौकशी सुरू केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिस अधिक तपास करत आहेत.
Mumbai Crime : महिला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार
दरम्यान, मुंबईतील जे जे रुग्णालयातून उपचारासाठी आणलेल्या एका महिला आरोपीने गर्दीचा फायदा घेत रुग्णालयातून पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुबाना शेख असे या महिला आरोपीचे नाव आहे. तिच्यावर फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणी तिला अटक करून भायखळा येथील महिला कारागृहात ठेवण्यात आले होते. रुबाना ही सुमारे पाच महिन्यांची गरोदर आहे. कारागृहात तिच्या तब्येत बिघडल्याने तिला वैद्यकीय उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारासाठी रुग्णालयात आणलेल्या रूबानाने गर्दीचा फायदा घेत पोलिसांच्या देखरेखीखालून पलायन केले. या प्रकरणी जे जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून महिला आरोपीचा शोध घेतला जात आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा