मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ नुकत्याच झालेल्या दोन लोकल ट्रेनच्या अपघाताचा प्रश्न आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता. भातखळकर यांनी उपनगरीय लोकलमध्ये वाढणारी गर्दी, गर्दीवरील उपाययोजना आणि खासगी उद्योग समूहांच्या कार्यालयीन वेळा बदलण्याबाबतच्या निर्णयावर प्रश्न विचारले. केंद्रीय रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवासी संघटनांची बैठक लावण्यात येणार का, असाही प्रश्न त्यांनी केला. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “साध्या लोकलच्या तिकिटाचे दर AC लोकलला लावता येतील का याविषयी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा सुरू आहे.” मुंबईतील उपनगरीय लोकलमध्ये वाढत्या गर्दीवर विधानसभेत चर्चा झाली. खाजगी आस्थापनांच्या वेळा स्ट्रॅगल करण्याबाबत राज्य सरकार, रेल्वे आणि इतरांकडून टास्क फोर्स स्थापन करून मार्ग काढता येईल का, यावरही प्रश्न विचारण्यात आले. केंद्रीय रेल्वेमंत्री, रेल्वे अधिकारी आणि प्रवासी संघटना यांची विस्तृत बैठक घेऊन समस्या युद्ध पातळीवर सोडवण्यासाठी राज्य सरकार बैठक आयोजित करणार का, अशी विचारणा झाली. मुंबईत देशभरातून लोक येतात आणि रेल्वे लोकलच्या जाळ्याचा विकास अपेक्षित प्रमाणात झालेला नाही, असेही नमूद करण्यात आले. डबल इंजिन सरकारकडे रेल्वेच्या विस्तारासाठी आणि दुर्घटना टाळण्यासाठी काही टाइम लिमिट प्रोग्राम आहे का, असेही विचारण्यात आले. लोकलमध्ये प्रवाशांना किड्या-माकडांसारखे भरले जाते, एकमेकांना ढकलले जाते, हे भयावह चित्र थांबवण्यासाठी काय कार्यक्रम आहे, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली.