
Mumbai Metro News : काही तांत्रिक अडचणींमुळे अंधेरी गुंदावली ते दहिसरला जाणारी मेट्रो लाईन ठप्प झाली होती. ती आता पुन्हा सुरू झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे अंधेरीकडून दहिसरला जाण्यारी मेट्रो सुमारे अर्धा तास बंद होती. परंतु मेट्रो सेवा पुन्हा सुरू झाल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली. पुढच्या एका तासामध्ये ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होईल असंही प्रशासनाने म्हटलं आहे.
मुंबई मेट्रो 2 अ आणि 7 मार्गिकेवर तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे काही वेळ मेट्रो स्टेशनवरच थांबली होती. त्यामधील प्रवाशांना ट्रेनमधून उतरवण्यात आलं होतं. नेमक्या संध्याकाळच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे कामावरून घरी जाणाऱ्यांचे मोठे हाल झाले.
Maha Mumbai Metro Tweet : काय म्हटलंय मेट्रो प्रशासनाने?
समस्या आता दूर करण्यात आली आहे आणि लाईन 2A व 7 वर गाड्यांची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. प्रवाशांना कळविण्यात येते की पुढील एका तासाच्या आत सेवा पूर्णपणे नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होतील. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि आपल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
Service update
The issue has been resolved, the trains have started moving on Lines 2A and 7. We would like to inform our passengers that services will be restored to schedule fully within an hour. We regret the inconvenience caused and thank you for your co-operation.…
— Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) October 3, 2025
भुयारी मेट्रोही काही वेळेसाठी बंद
मेट्रो 3 म्हणजे भुयारी मेट्रोच्या सेवेत शुक्रवारी दुपारी अगदी काही वेळासाठी खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं. वरळी नाका म्हणजे आचार्य अत्रे चौकाच्या दिशेनं जाताना दुपारी पावणे तीनच्या सुमारास एका मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यावेळी ती मेट्रो एअरपोर्ट टर्मिनल वन स्थानकावरून सांताक्रुझ स्थानकाच्या दिशेनं जात होती. या मेट्रोमधून धूर आल्यानं, त्यातील प्रवाशांना सांताक्रुझ स्थानकावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. त्यानंतर ती मेट्रो तांत्रिक तपासणीसाठी बीकेसी लूपलाइनवर नेण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना पुढच्या ट्रेननं रवाना करण्यात आलं.
प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि त्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत. प्रवाशांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि त्यासाठी आवश्यक ती सर्व प्रोटोकॉल तात्काळ पाळण्यात आली आहेत असं मेट्रो प्रशासनाने म्हटलं.
आणखी वाचा