
मुंबई : विवाहबाह्य संबंध उघड झाल्याने संतापलेल्या पत्नीने लॉजवर धाड टाकल्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी मध्यरात्री ऐरोली खाडी पुलावरून उडी मारलेला हा रिक्षाचालक गुरुवारी सकाळी गाळात अडकलेल्या अवस्थेत जिवंत सापडला. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची आणि खाडीत उडी मारल्याची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाने दोन तास शोधमोहीम राबवली. तो वाहून गेल्याचे समजून तपास थांबवला, मात्र गुरुवारी सकाळी तो गाळात रुतलेल्या अवस्थेत आढळून आला.
“आता आत्महत्या करतोय” असे सांगत त्याने पुलावरून उडी मारली
ठाण्यातील रहिवासी हा रिक्षाचालक परस्त्रीच्या प्रेमात असल्याची पत्नीला माहिती मिळाली होती. तिने बुधवारी पतीवर पाळत ठेवली आणि तो परस्त्रीसोबत लॉजवर गेल्याचे लक्षात येताच धाड टाकली. पतीचे बिंग फुटल्याने संतप्त पत्नीने त्याला चांगलाच जाब विचारला. अपमानित झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षाचालक थेट ऐरोली खाडी पुलावर पोहोचला. त्याने तेथून पत्नीला फोन करून आपल्या चुकीची कबुली दिली. तसेच “आता आत्महत्या करतोय” असे सांगत त्याने पुलावरून उडी मारली. काही वेळातच याची माहिती नातेवाईक व पोलिसांना मिळाली. रबाळे पोलिस, ऐरोली अग्निशमन दल आणि नातेवाईकांनी जवळपास दोन तास शोधमोहीम राबवली. मात्र, तो वाहून गेला असावा असे समजून शोध थांबवण्यात आला.
गुरुवारी सकाळी मात्र खाडीपुलापासून काही अंतरावर एका तरुणाला गाळात अडकलेल्या अवस्थेत पाहून स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिस पथकाने बोटीच्या साहाय्याने त्याला बाहेर काढले. चौकशीदरम्यान तोच बुधवारी मध्यरात्री पुलावरून उडी मारणारा रिक्षाचालक असल्याचे स्पष्ट झाले. नाट्यमय पद्धतीने त्याचा जीव वाचला असला तरी या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास रबाळे पोलिस करत आहेत.
आणखी वाचा