मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकडे येणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मलाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर, विलेपार्ला, सांताक्रूज, बांद्रा या सर्व परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. अंधेरीच्या मरोळ आणि साखरकांडा परिसरातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कामावर निघालेल्या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि साचलेले पाणी काढण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. दृश्यमानता कमी झाल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मेट्रो सेवेवरही पावसाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.