मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईच्या पश्चिम आणि मध्य उपनगरांना पहाटेपासूनच पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. साकीनाका मेट्रो परिसर जलमय झाला आहे. वाहन चालकांना पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये रात्रभरापासून पाऊस सातत्याने पडत आहे. साकीनाका, घाटकोपर या भागांमध्ये पाणी साचल्याचे दिसून येत आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरातही सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशनवरून ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना दोन ते तीन फूट पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर आणि गोवंडी परिसरामध्ये पाऊस जोरदार कोसळत आहे. यामुळे सखल भागांमध्ये काही ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मात्र, रेल्वे वाहतूक व्यवस्था अजूनही सुरळीत सुरू आहे. लोकल व्यवस्थेला कोणताही परिणाम झालेला नाही. मुंबई महानगरपालिका पाणी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.