
मुंबई : राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडी (Dahihandi) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत जय जवान पथकाने 10 थर रचत नव्याने विक्रम केला असून मुंबईतील इमारतीप्रमाणे मुंबईच्या गोविंदा पथकाचे उंचच उंच मनोरे पाहून चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. दरम्यान, मुंबईतील (Mumbai) दहीहंडी उत्सवात तब्बल 318 गोविंदा जखमी झाले असून 294 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 24 गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, दोन गोविंदांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मनोऱ्यावरुन पडल्याने हा मृत्यू झाला असून एका गोविंदाचा मृत्यू काविळने झाला आहे. तर, दहीहंडीसाठी रोप बांधताना तोल गेल्याने खाली पडून दुसऱ्या गोविंदाला आपला जीव गमवावा लागला. मात्र, या घटनेनं दहीहंडीच्या उत्सवावर संबंधित परिसरात शोककळा पसरली आहे.
मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील ही दुर्घटना असून दहिहंडी रोप बांधताना तोल गेल्याने गोविंदाचा खाली पडून अपघात झाला. या दुर्घटनेनंतर जखमी अवस्थेतील गोविंदाला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. आता, पवईतील एका गोविंदाचा काविळने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईच्या पवई परिसरात राहणाऱ्या 14 वर्षीय बाल गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून काविळमुळे हा मृत्य झाल्याचे समजते. पवई आदर्श नगर परिसरात राहणारा 14 वर्षीय बाळ गोविंदाला कावीळ झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, कावीळ असताना देखील तो काल दहीहंडी उत्सव पाहायला गेला होता, काल दिवसभर दहीहंडी उत्सवात फिरल्यानंतर संध्याकाळी असल्फा परिसरातील दहीहंडी उत्सवात पोहोचल्यावर अचानक त्याची तब्येत खराब झाली. त्यानंतर, त्याला राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, राजावाडी रुग्णालयमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी एडीआर दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, मुंबईत काल शनिवारी झालेल्या दहीहंडी उत्सवामध्ये एकूण 318 गोविंदा हे जखमी झाले असून यातील 294 गोविंदांना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अद्यापही 24 गोविंदा मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील दोन गोविंदांची प्रकृती गंभीर आहे. सकाळी आलेल्या माहितीनुसार हा वृत्तांत देण्यात येत आहे.
दरम्यान, भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवात बोलताना म्हटले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकासाची हंडी उंच चालली आहे. विकासाचे मनोरे लावून हंडीतील लोणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.
हेही वाचा
चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक, आगमन सोहळ्याला मुंगी शिरायलाही जागा नाही इतकी गर्दी
आणखी वाचा