नालासोपाऱ्यातील गडगा पाडा येथील साई वेलफेअर सोसायटीत एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह घरातच पुरला होता. मृत व्यक्तीचे नाव विजय चौहान असून, आरोपी महिलेचे नाव गुड़िया चमन चौहान आहे. तिचा प्रियकर मोनू विश्वकर्मा हा फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुड़िया आणि मोनू यांच्यात प्रेमसंबंध होते आणि पती त्यांच्या नात्यात अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी मिळून विजयची हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह घरातच पुरून त्यावर टाइल्स बसवण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे, मृताच्या भावाकडूनच त्या टाइल्स लावून घेण्यात आल्या होत्या. ही घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती आणि तेव्हापासून विजय चौहानचा शोध सुरू होता. दोन दिवसांपूर्वी गुड़ियाच्या मोबाईलवर आलेल्या एका संशयास्पद संदेशामुळे या भयंकर खुनाचा उलगडा झाला. मृताच्या भावाला घरात नवीन टाइल्स दिसल्याने संशय आला. टाइल्स काढल्यावर दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी गुड़ियाला अटक केली असून, फरार मोनू विश्वकर्माचा शोध सुरू आहे. या प्रकरणी खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.