
मुंबई: भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्या स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे (anant garje) यांच्या पत्नीने मुंबईतील घरात काल (शनिवारी, ता२२) टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा ७ फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यात त्यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. काल सायंकाळी सात वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वरळी पोलिसानी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दहा महिन्यांपूर्वी गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचा विवाह झाला होता. त्यांच्या विवाह सोहळ्यास पंकजा मुंडेंसह डॉ.प्रितम मुंडे आणि आ.नमिता मुंदडा देखील उपस्थित होत्या, या घटनेनंतर पंकजा मुंडेंनी त्यांच्या लग्नाची शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
Social Media Post: पंकजा मुंडे यांनी लग्नाची शेअर केलेली पोस्ट काय?
माझ्या पुत्रासमान, माझा स्वीय सहाय्यक चि. अनंत गर्जे याचा आज शुभ विवाह पार पडला. चि. सौ.कां. डाॅ.गौरी सारखी सुंदर आणि सुशील सहचारिणी त्याला मिळाली. आज बीड येथे या दोघांच्या शुभ विवाह सोहळ्यात माझी आई, डॉ.प्रितमताई यांचेसह उपस्थित राहून नव वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. समवेत आ.नमिता मुंदडा उपस्थित होत्या.
Anant Garje Wife : अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याचा संशय
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर येताच खळबळ उडाली. डॉ. गौरी गर्जे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. १० महिन्यांपूर्वीच पीए अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांचा विवाह झाला होता. तर अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याचा संशय असल्याने गौरी गर्जे या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे.नवऱ्याचे बाहेरच्या महिलेशी अनैतिक संबंध आहेत, यावरुन दोघांमध्ये भांडणं व्हायची, त्या मानसिक तणावात होत्या,
Anant Garje Wife : पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती
काही महिन्यापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे. मृतदेह रुग्णालयात असून त्यावर पोस्टपार्टम केले जाणार आहे. पोस्टमार्टममधून सत्य बाहेर येईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अनंत गर्जे यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाल्याची माहिती आहे. या लग्नाला स्वतः पंकजा मुंडे या देखील उपस्थित होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या 10 महिन्यांत अनंत गर्जेंच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
Anant Garje Wife : अवघ्या दहा महिन्यांचा संसारात नेमकं काय घडलं
अनंत गर्जे (anant garje) आणि डॉक्टर गौरी पालवे यांच्या लग्नाला देखील पंकजा मुंडे आपली बहीण प्रीतम मुंडेंसह गेल्या होत्या, मोठ्या थाटामाटात ७ फेब्रुवारीला लग्न झालं होतं. अवघ्या दहा महिन्यांचा संसारात नेमकं काय घडलं, त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे, तर अनंत गर्जे यांचे अफेअर असल्याने गौरी गर्जे या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गौरी गर्जे यांचा सासरच्या मंडळींकडून छळ होत होता, असा आरोप देखील त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. वरळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला, शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे, कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे, अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु आहे.
Anant Garje Wife : डॉक्टर गौरी पालवे यांच्या मामाने सांगितलं नेमकं काय घडलं?
डॉक्टर गौरी पालवे यांच्या मामाने एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, काल दुपारी एक वाजल्यापासून त्यांची भांडणं सुरू होती. अनंत गर्जेचे बाहेर संबध होते. हे तिला माहिती होतं. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. तिने त्याचे चॅटींग देखील पाहिले होते. ते तिच्या वडिलांना पाठवून ठेवले होते. अनंत सांगतोय की तिने माझ्यासमोर आत्महत्या केली. मात्र, आमचा विश्वास नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. माझी बहीण, मुलीचे वडील कालपासून पोलिस ठाण्यात बसून आहे. सामान्य लोकांना न्याय मिळत नाही.
गौरी पालवे यांचे मामा शिवदास गर्जे म्हणाले की, पंकजाताई यांना हा माणूस माहीत नव्हता की, हा किती नालायकपणा करत आहे. ताईंचा यात काहीही विषय नाही. पण, अनंत गर्जेने मुलीच्या वडिलांना फोन केला अन् लगेच कट केला. त्यानंतर तिच्या आईला फोन करून सांगितले की, तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. तिची डेड बॉडी माझ्यासमोर आहे. दोन-तीन महिन्यांपासून गौरीचे आणि त्याचे वाद सुरू होते. गौरीला त्याचे अफेअरचे काही प्रकरणादेखील माहिती झाले होते. तरीही तिने त्याला माफ केले होते. पण, तिने त्याला पुन्हा चॅटिंग करताना पाहिले. त्यामुळे त्यांचे वाद होत होते. तो तिला खूप टॉर्चर करत होता, असा आरोप त्यांनी केलाय.
शिवदास गर्जे पुढे म्हणाले की, त्याने स्वतःच्या हातावर वार करून घेतले होते. तो तिला म्हणायचा की, मी स्वतः मरेल आणि तुला यात गुंतवेन. ती डॉक्टर मुलगी होती. ती लढाऊ मुलगी होती. ती कधीच आत्महत्या करू शकत नाही. पंकजा ताईंना याबाबत काही माहीत नाहीत. त्यांचा काहीही दोष नाही. ताई याला हाकलून देणार, असले नालायक लोक ताई सांभाळत नाही, असे देखील त्यांनी म्हटले.
आणखी वाचा