
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज 337 वी पुण्यतिथी असून, यानिमित्त पुण्यातील शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक, तुळापूर या गावी मोठ्या प्रमाणावर बलिदान दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवभक्त आणि शंभूभक्त या ठिकाणी दाखल झाले आहेत. गेल्या 40 दिवसांपासून चालणारा बलिदान मास शंभूभक्तांकडून पाळला जातो. या काळात भक्त अत्यंत आवडत्या गोष्टींचा त्याग करतात, मांसाहार टाळतात आणि कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत नाहीत. आजच्या दिवशी सर्व भक्त वढू बुद्रुक, तुळापूर येथे शंभू महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. दिवसभर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश गडगांवातील शंभू महाराजांचे शौर्य आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्मरणात ठेवणे आहे.